नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सहा महिन्यांत सुरु होणार

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
मुंबई (प्रतिनिधी) – कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील 15 अवर्षणग्रस्त जिल्हे व खारपणपट्टा भागात राबवण्यात येणार असून हा प्रकल्प येत्या सहा महिन्यात प्रत्यक्षात सुरु करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे नानाजी देशमुख कृषी सिंचन प्रकल्पाचे सादरीकरण या प्रकल्पात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील आमदारांसाठी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. गेल्या 15 वर्षांपासून राज्याच्या कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. लहरी हवामानामुळे कृषी क्षेत्रावर होणारे बदल तसेच विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी झाली आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
हा एकात्मिक स्वरूपाचा प्रकल्प असून त्यामाध्यमातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील 5 हजार गावे प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली असून येत्या तीन वर्षात या गावांमध्ये दृष्यस्वरूपातील बदल दिसणार आहेत. जागतिक बॅंकेने देखील हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर घेतला आहे. सध्या सुरु असलेल्या कृषी योजना या प्रकल्पात एकत्रित करण्याबरोबरच राज्याच्या कृषी क्षेत्राच्यादृष्टीने हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील अवर्षणग्रस्त व खारपाण पट्टा जमिनी असलेल्या जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या 15 जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्प संचालक विकास रस्तोगी यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)