नादुरूस्त हॅंडसेट परत घेऊन किंमतीचे 1900 रुपये देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश

खरेदी केलेले दुकान आणि मोबाईल उत्पादक कंपनीच्या विरोधात निकाल
पुणे, दि. 29 (प्रतिनिधी) – सदोष मोबाईल हॅंडसेटची विक्री केल्याप्रकरणी ग्राहक मंचाने मायक्रोमॅक्‍स कंपनीला फटकारले आहे. नादुरूस्त हॅंडसेट परत घेऊन त्याची किंमत 1900 रुपये निकालाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्याच्या आत देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष व्ही.पी.उत्पात, सदस्य ओंकार पाटील आणि क्षितीजा कुलकर्णी यांनी दिला आहे. याबरोबरच नुकसानभरपाई आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 500 रुपये तक्रारदारांना देण्यात यावेत, असेही ग्राहक मंचाने आदेशात नमुद केले आहे.
याबाबत मोहिनी ट्रेडर्सतर्फे सत्येंद्र राठी (रा. शनिवार पेठ) यांनी ऍड. ए.एस. ढोबळे यांच्यामार्फत मोबाईल ग्लोब इंटरप्रायझेस एलएलपी, जंगली महाराज रस्ता, मायक्रोमॅक्‍स इनफ्रीनटी सोल्यूशन, नारायण पेठ आणि मायक्रोमॅक्‍स इन्फॉरमॅटीक्‍स लि. दिल्लीच्या विरोधात 9 जून 2016 रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. राठी यांनी मोबाईल ग्लोब इंटरप्रायझेस येथून 5 जून 2015 रोजी मायक्रोमॅक्‍स कंपनीचा 1900 रुपये किंमतीचा मोबाईल खरेदी केला. 14 ऑक्‍टोबर 2015 रोजी तो मोबाईल नादुरूस्त झाला. राठी यांनी मायक्रोमॅक्‍स कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर असलेल्या नारायण पेठ येथील मायक्रोमॅक्‍स इनफ्रीनटी येथे मोबाईल दुरूस्तीसाठी दिला. सर्व्हिस सेंटरने 3 नोव्हेंबर 2015 रोजी हा हॅंडसेट दुरूस्त करून दिला. त्यानंतरही हा हॅंडसेट बंद पडत होता. त्यामुळे राठी यांना मानसिक त्रास होत होता. त्यामुळे राठी यांनी ऍड. ए.एस.ढोबळे यांच्यामार्फत ग्राहक मंचात धाव घेतली. मोबाईलची किंमत 1900 रुपये, नुकसानभरपाई म्हणून 15 हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपयांची मागणी ग्राहक मंचात केली. नोटीस बजावूनही मोबाईल ग्लोब इंटरप्रायझेस एलएलपी, जंगली महाराज रस्ता, मायक्रोमॅक्‍स इनफ्रीनटी सोल्यूशन, नारायण पेठ आणि मायक्रोमॅक्‍स इन्फॉरमॅटीक्‍स लि. दिल्लीच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निकृष्ट दर्जाची सेवा दिल्याचा निष्कर्ष काढत मंचाने वरील आदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)