नात्यातला विसंवाद

गत पाच वर्षांत सर्वाधिक गतिमान कुणी झाले असेल तर ते आहे, सोशल मीडिया, याचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम. दुरावत चाललेली नाती, नात्यातला संवाद आणि तुटण्याच्या मार्गावर असणारी कुटुंबव्यवस्था.

सोशल मीडिया आता किती फोफावलाय आणि त्याची व्याप्ती किती वाढलीय, हे नव्याने सांगण्याची गरजच उरलेली नाही. हातोहाती मोबाईल दिसत असल्याने आणि अवघ्या काही रुपयांमध्ये नेटपॅकही मिळत असल्याने नेटकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

अगदी बारा-तेरा वर्षाच्या किशोरांपासून सर्वांना या वेडाने झपाटले आहे. लाईक्‍स मिळविण्याची चढाओढ लागलीय. लाईक्‍ससाठी इतरांच्या पोस्टही शेअर केल्या जाताहेत. यातल्या साहित्य चोरीच्या मुद्द्यांवर तर स्वतंत्र पीएचडी होईल. व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर तर काही वेगळाच धिंगाणा असतो. अगदी सकाळी उठल्यावर कोण पहिली पोस्ट टाकतंय यासाठी जणू स्पर्धाच असते.

ब्रश केल्यानंतर हाती चहाचा कप घेण्याआधी मोबाईल घेतला जातो. बरं, त्यातही पोस्ट कोण टाकतंय यावर प्रतिक्रिया अवलंबून असते. हे ग्रुप बहुतांश वेळा मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी यांचेच असतात. असे असूनही त्या छोट्या ग्रुपमध्येही हेवेदावे, स्ट्रॅटेजी, चालबाजपणा, कावेबाजपणा, डिवचणे, रुसवे, फुगवे असे सारे काही चालते. किंबहुना हेच प्रकार जास्त दिसतात. कित्येकदा तो अॅडमिन त्रासून जातो की आता ही भांडणं मिटवायची तरी कशी? तो आपल्या भूमिकेला अनुसरून मध्यस्थी करतो.

पण, त्या दोघांच्या मनातील विसंवाद हा लवकर जात नाही. तो कायमच असतो. पुढचे काही दिवस मग पूर्ण ग्रुपवरच याची अवकळा दिसते. क्वचित प्रसंगी एखाद्याचे मन राखण्यातच अॅडमिन आणि इतर ग्रुप मेंबर्सची कसरत सुरू असते. असे होत असेल तरीही संवादाची ही प्रक्रिया अपयशीच म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून या चेकाळलेल्या व्हॉट्‌सअॅप आणि ट्विटर वॉरमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्याही बातम्या येताहेत.

अनेक महाभागांनी केवळ फोन घेतला नाही, लाईक्‍स केले नाही, मेसेज वाचल्याच्या ब्ल्यू लाईन्स दिसल्या नाहीत इथपासून ते घटस्फोट देणे, जीव घेणे असे प्रकार केले आहेत. अशा बातम्या वाचल्या की मन व्यथित होतं. आपण जर सोशल नेटवकग साईटवर सक्रिय असू तर मग आपल्यालाही कधीतरी अशा वादांचा अनुभव असतोच. पण, हे वाद इतके विकोपाला जाणे तितकेसे निकोप नसते.

आपल्या देशात गुन्हेगारीचे प्रमाण बरेच वाढलेय, असे सरकारी आकडेवारीच सांगतेय. असे असताना सोशल नेटवर्किंगमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांनी यात भरच पडली आहे. नुकतीच औरंगाबाद येथे घडलेली घटना म्हणजे एका महिलेला तिच्या नवऱ्याने व्हॉट्‌सअॅपवर चॅटिंग करू नको, असे टोकले तर तिने थेट गळफास लावून आत्महत्या केली. त्यात तिचा प्राण गेला. त्या दोघांमध्ये एरवीही या मुद्यावरून भांडण होतच होते. तिचे सतत चॅटिंग करणे, व्हॉट्‌सअॅपवर असणे त्याला आवडत नव्हते. त्यासाठी त्याने तिला बरेचदा टोकले. नंतर तर या वादाने इतके भयानक रूप घेतले की त्यात तिचा जीव गेला. नव्हे तिने स्वत:चा जीव घेतला.

आतापर्यंत आपण एखाद्या व्यसनामुळे लोकांना आत्महत्या करताना ऐकले, पाहिले होते. पण, आता या व्यसनांमध्ये मोबाईल, सोशल नेटवर्किंग साईट्‌सचे व्यसनही आले आहे. आज असेही लोक आपल्या आजुबाजूला आहेत ज्यांना मोबाईल पाहिल्याशिवाय काही सेकंदही राहावत नाही. दर सेकंदाला मोबाईलमध्ये एखादा मेसेज येतो हे खरे असले तरीही स्वत:ला कुठे थांबवायचे हे आपले आपण ठरवले पाहिजे. घरातील नवीन पिढी तर याबाबतीत व्यसनाधीन झालीय. त्यात भरीस भर म्हणून गृहिणी, कर्ता पुरुषही यात गुंतलेय. आता कोणी कोणाला थांबवायचे हा प्रश्न आहे.

नव्या युगाची कास धरून पुढे जाणे हे प्रॅक्‍टिकली अगदी योग्य आहे. पण, या पुढे जाण्याचा वेग इतकाही नको की त्यात आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षणही मागे पडून जातील. विशेष म्हणजे या संवादाच्या माध्यमाला विसंवादाचे गालबोट लागत असेल तर त्याच्या मूळ उद्देशालाच मूठमाती मिळेल. मोबाईलवरून होणारे वाद, मोबाईलद्वारे होणारे वाद आणि मोबाईलमुळे होणारे वाद हे या विसंवादाचे उदाहरण आहे. एका मर्यादेनंतर मोबाईल वापरणाराही वैतागतो. यार, कोणी बनवले हे डबडे. माणसाला पागल करून ठेवलेय, अशी वाक्‍येही आपण ऐकत असतो. हे ऐकून काही वर्षापूर्वीच्या टीव्हीची आठवण झाली. टीव्ही आल्यानंतर काही वर्षातच त्याचे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांना इतके वेड लागले की त्याला इडियट बॉक्‍स असेच नाव पडले होते. आता मोबाईलमधील व्हॉट्‌सअॅपमुळे टीव्हीचे वेड काही प्रमाणात का होईना कमी झालेय. टीव्हीचे वेड कमी झाले हा एक चांगला परिणाम आहेच. पण, खुद्द व्हॉट्‌सअॅपचे वेड नको तितक्‍या प्रमाणात फोफावलेय. त्यातून अनेक कामे सोपी झाली असली तरी एरवी आपले आजुबाजूचे वातावरण आणि प्रसंगी देहभान विसरून त्याच्यामध्ये गुंतलेली पिढी पाहिली की याची परिणती नेमकी काय होणार, असा सहज विचार डोकावून जातो. अति सर्वत्र वर्ज्यते असे म्हटलेलेच आहे.

मोबाईल मेनिया, मोबाईल फोबिया असे अनेक नवनवीन आजार आता डोके वर काढताहेत. त्यासोबतच सायबर गुन्हेही हातातील मोबाईलच्या एका क्‍लिकवर आलेत. असे असताना निव्वळ संवादासाठी असणारे हे माध्यम आणखी किती विसंवाद, वितंडवाद घडवेल याची धास्ती वाटायला लागते. जाता जाता मुली आणि महिलांनी इतरांच्या हातातील मोबाईलपासून जरा सावध राहावे. एखाद्या मोबाईलमधील कॅमेरा कदाचित तुमच्या मागावर असेल, अशी शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जागे रहा, रात्र वै-याची आहे, भीती मोबाईलच्या कॅमे-याची आहे. आणि पुढे येणा-या संकटाच्या चाहूलाचीही आहेच.

– जयंती शहा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)