नाती विस्कटत जाताना

“”झुकझुक झुकझुक आगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी
पळती गाडी पाहू या मामाच्या गावाला जाऊ या”
हे गाणं ऐकताना मनाला कितीतरी आनंद होतो. पूवी खरोखरच प्रत्येक मामाचा गाव सुंदर होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत भाचे मंडळी मामाच्या गावाला जात. तेथे आजी-आजोबा, मामा-मामी ही लाड करणारी मंडळी होती. मामाचे घर ऐसपैस होते. पुढे प्रशस्त अंगणात तुळशीवृंदावन होते. तुळशीवृंदावनाला मोठा कट्टा होता. रात्री त्या कट्ट्यावर बसून आजी गोष्ट सांगे. खाण्याची चंगळ असे. सोबतीला आंबे, बोरं, करवंदं यांसारखा रानमेवा असे.
शेतात पाण्याने तुडुंब विहीर भरलेली असे. त्यात पोहायला मजा येत असे. गोठ्यात खिल्लारी बैल असत. बैलांबरोबर गायी, म्हशी असत. दुधा-तुपाचा तुटवडा नसे. अंगणात मोत्या कुत्रा, घरात मनीमाऊ हा सारा गोतावळा असे. कोंबड्याच्या खुराड्यात पाच-पंचवीस कोंबड्या असत. शेतात हिरवागार ऊस असे. गावातील मंदिरामध्ये भजन कीर्तन चाले. सारे कसे स्वप्नवत होते. पण आज मामाचा गाव तसा उरला नाही. मामाची शेती आकुंचली आहे. भावा-भावांच्या वाटण्यात तिचे तुकडे पडले आहेत. शिवार आता पूर्वीसारखे हिरवागार उरले नाही. विहिरींनी तळ गाठलाय. गोठ्यातले खिल्लारी बैल बाजारात विकले गेलेत. मामाची शेतीच दोन-तीन एकरावर आलीय. पूर्वीचा डामडौल आता उरला नाही. आजी-आजोबा घरातून परागंदा झाल्याने उदास उदास दिसू लागलंय. मामा-मामींकडं पूर्वीचा तो जिव्हाळा राहिला नाही. परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आताची मामाची परिस्थिती पाहून उदासवाणं वाटतं. मनात प्रश्‍न उठतो, की कुठं गेले ते दिवस? परत फिरून ते दिवस येणार नाही का? तर आतून उत्तर नकारात्मक येतं. याचं कारण दिवसेंदिवस पाऊसकळा कमी कमी होत गेलाय. शेताची उभी आडवी वाटणी झालीय. मामांच्यातच एकी राहिली नाही. त्यांची भांडणं,वाटण्यांसाठीचा तंटा आता गावपातळीवर न राहता, कोर्ट दरबारी पोहोचला आहे. शेती थोडी, खाणारी तोंड जास्त. उत्पन्नाची साधनं तोकडी. कर्जबाजारीपणा, बेरोजगारी हे प्रश्‍न पाचवीला पूजलेत. मामालाच जगण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागतोय. त्यामुळं गाण्यातलं मामाचं गाव कितीही सुंदर असलं, तरी प्रत्यक्षात ते तसं उरलं नाही. हे फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नसून संबंध देशपातळीवर हीच परिस्थिती आहे.
त्यात अलीकडे भावाबरोबर बहिणींचेही नाव सात-बाऱ्याला लावण्याचा कायदा निघाला आहे. त्यामुळे वडिलोपार्जित मिळकतीमध्ये भावाबरोबर बहिणींचीही नावे मिळकतीला लागली आहेत. आता बहिणी भावांकडे कायद्याने वाटा मागत आहेत. हा प्रश्‍न प्रेमाने न मिटल्यामुळे कोर्टात गेला आहे. त्यामुळे बहीण विरुद्ध भाऊ असा सामना रंगू लागला आहे. सर्वत्रच हा प्रश्‍न उग्र बनला आहे. बहीण भावांनी प्रेमाने घरी भेटण्याचे दिवस संपलेत. ते एकमेकांना कोर्टात भेटतात. एकमेकांकडे ढुंकूनही पाहात नाहीत. बोलण्याचा तर प्रश्‍नच नाही. अशावेळी –
“”सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती
वेड्या बहिणीची वेडी ही माया”
हे गीत आठवते आणि परिस्थिती किती बदलीय याची उग्र जाणीव होते.
हा प्रश्‍न जसा कौटुंबिक आहे तसा तो सामाजिकही आहे. संपत्तीच्या वाटणीतून तो निर्माण झाला आहे. पूर्वी “चोळीबांगडी’ भावाकडून घेणे हा बहिणीचा नैतिक हक्क होता. भाऊही तो हक्क मोठ्या प्रेमाने आणि आवडीने पुरा करीत असे. पण जेव्हा हा हक्क प्रेमाच्या, आपुलकीच्या पातळीवर न राहता तो कायद्याच्या पातळीवर गेला, तेव्हा त्याला देवघेवीचे स्वरूप आले. बहीण “”मला एवढं एवढं मिळालं पाहिजे, तर मी हक्कसोडपत्रावर सही करीन. नाहीतर सही करणार नाही.” असे रोखठोक सांगू लागली. त्यामुळे इथे प्रेमाची भाषा मागे पडली आणि हक्काची, अधिकाराची, कायद्याची भाषा सुरू झाली. यात प्रेम मागे पडले, जिव्हाळा शुष्क झाला, माया आटली आणि कायदा बोलू लागला. या सर्व ओढाताणीत नाती उसवू लागली. भाचरांचा “मामाचा गाव’ फक्त स्वप्तातच उरला.
यावर कायद्याच्या उपायांपेक्षा प्रेमाचा उपायच उपकारक ठरेल. नाती उसवू द्यायची नसतील, ती टिकवायची असतील तर थोडी तडजोड केली पाहिजे. थोडी देवघेव केली पाहिजे. थोडा संयम आणि समन्वय राखला पाहिजे. बहिणीची परिस्थिती खरोखरच बेतासबात असेल तर भावाने मोठ्या मनाने चर्चा करून, संवाद साधून त्यातील काही वाटा दिला पाहिजे. बहिणीनेही भावाची “ओवाळणी’ म्हणून स्वीकारली पाहिजे आणि ज्या ठिकाणी बहिणींची परिस्थिती चांगली आहे, घरी सुबत्ता आहे, तिथे बहिणींनी प्रेमाची नाती टिकविण्यासाठी त्या मिळकतीवरचा हक्क सोडला पाहिजे. आपली माहेरची वाट सुरू ठेवली पाहिजे. शेवटी माणसाची आसक्ती कधी संपत नाही. ही न संपणारी दौड आहे. आपण किती ताणायचं आणि कुठं थांबायचं हे आपल्याच हातात आहे. याचे उत्तर आपल्या मनातच आहे. ते कुठल्याही कोर्टात आणि वकिलांकडे नाही. शेवटी शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हेच खरे!
– डॉ. दिलीप गरूड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)