नाणेकरवाडीत बाटली आडवी

महाळुंगे इंगळे-प्रचंड टोकाचे राजकारण असलेल्या व चाकण उद्योग पंढरीत सर्वात श्रीमंत समजल्या जात असलेल्या नाणेकरवाडी येथे दारूबंदीसाठी मतदान प्रक्रियेत चक्क महिला व तरुणींनीच बाटली आडवी केल्याने रिमझिम पावसात नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. बाटली प्रक्रिया व दारूबंदीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान होवून 820 मतांनी दारूची बाटली आडवी झाली. दारूबंदीसाठी नाणेकरवाडीत झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 1303 मतदानापैकी 903 मतदान झाले. पैकी आडव्या बाटलीसाठी 820, तर उभ्या बाटली साठी अवघे 46 मतदान झाले. 37 मतदान अवैध झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व खेडचे नायब तहसीलदार बी. बी. बोडके यांनी दिली.
नाणेकरवाडीमध्ये दारूबंदी विरोधात प्रचार करण्यासाठी गावातीलच महिलांनी विडा उचलला होता. यात विद्यार्थिनीसह महाविद्यालयीन युवती, महिला व येथील ग्रामस्थांनी देखील आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गांवर बाटली आडवी झाल्यानंतर लगतच्या गावांमध्ये बाटली उभी राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. नाणेकरवाडीत दारुबंदीचा ठराव असताना दारुची दुकाने लोकवस्तीमध्ये नव्याने थाटण्यात आली होती. संबंधित दारूच्या दुकानांना गावातील काही राजकीय मंडळींनी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप होत होता. मात्र, लोकवस्तीकडे घुसलेल्या दारूच्या दुकानांना नाणेकरवाडीच्या महिलांनी तीव्र विरोध सुरु केला होता. याबाबत सरपंच राजू नाणेकर यांच्या पुढाकाराने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे बाटली आडवी करण्यासाठी नाणेकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली.
महिलांनी या मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 1303 पैकी 903 महिला धाडसाने मतदानासाठी बाहेर पडल्या. गावातील दारू दुकानाशी संबंधित काही मंडळींनी महिलांना पैशांचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. त्यामुळे नाणेकरवाडीत दारुची बाटली आडवी होणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण होती. मतमोजणी नंतर अवघ्या दीड तासात निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार बी. बी. बोडके यांनी 820 मतांनी बाटली आडवी झाल्याचे घोषित करताच गावातील महिलांनी एकाच जल्लोष केला.
चाकण पोलिसांकडून यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी खुद्द खेडचे आमदार सुरेश गोरे, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी. आर. परब व त्यांचे सहकारी, नाणेकरवाडीचे सरपंच राजू नाणेकर या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेवून होते.

संबंधित निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी बोडके हे जिल्हा प्रशासनाला या बाबतचा अहवाल देतील त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग तत्काळ नाणेकरवाडी येथील दारूची दुकाने बंद करणार आहेत.
– डी. आर. परब, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)