नाणार विरोधात शिवसेना आक्रमक

शिवसेनेच्या आमदारांनी राजदंड पळवण्याचा केला प्रयत्न


विधानसभेचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब

मुंबई – कोकणातील नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहीजे या मागणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात औचित्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करू न दिल्याने शिवसेना आमदार आक्रमक झाले. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी “रद्द करा, रद्द करा, नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करा…’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडला. या गोंधळात चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

अखेर बोलण्याची परवानगी न मिळाल्याने शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि प्रताप सरनाईक यांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या प्रचंड गोंधळात सभागृहाचे कामकाज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी तहकूब केले.

कोकणातील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नाणारमधील स्थानिक नागरिकांनी नागपूर विधानभवनावर आज मोर्चा काढला. हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथेच अडविण्यात आल्याने नागरिकांनी तिथेच धरणे सुरू केले. नाणार रिफायनरीला विरोध करण्यासाठी आलेल्या स्थानिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शिवसेना आमदार राजन साळवी यांनी विधानसभेत याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली.

यावेळी पीक कर्जावरील 293च्या प्रस्तावाचे उत्तर लांबल्याने आता हे उत्तर होऊ द्या, मग बोलू देतो अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या. पण नाणारविषयी स्थानिकांच्या भावना तीव्र असून औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. मात्र याला परवानगी न मिळाल्याने शिवसेना आमदार सुनील प्रभू, राजन साळवी, सुनील शिंदे, वैभव नाईक, प्रताप सरनाईक, अजय चौधरी, राजन साळवी, मंगेश कुडाळकर, प्रकाश फातर्पेकर, चंद्रदीप नरके, सुभाष साबणे यांच्यासह सर्वच शिवसेना आमदारांनी वेलमध्ये धाव घेतली.

“रद्द करा रद्द करा, नाणार प्रकल्प रद्द करा’ अशा जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. या गोंधळात चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर शिवसेना आमदारांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. मात्र परवानगी न मिळाल्याने शिवसेना आमदार अधिक आक्रमक झाले सर्व आमदार वेलजवळ जमा झालेले असतानाच आमदार राजन साळवी आणि प्रताप सरनाईक अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहोचले. त्यांनी राजदंडाला हात घातला. यावेळी चोपदाराने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजदंडाला या दोघांनीही राजदंड सोडण्यास विरोध केला. यावेळी झालेल्या प्रचंड गोंधळात सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)