नाणार प्रकल्पाचे संग्रहित छायाचित्र

सत्ताधारी व विरोधकांचा महागोंधळ


दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

नागपूर – कोकणच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणाऱ्या नाणार येथील बहुचर्चित तेल रिफायनरी प्रकल्पावरून आज दुसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात रणकंदन झाले. “नाणार रद्द झालाच पाहिजे, नाणार जाणार…’ अशा शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करीत सभागृहाचे कामकाज रोखून धरले.

या महागोंधळात विधानसभेचे कामकाज 4 वेळा, तर विधानपरिषदेचे कामकाज एकदा तहकूब करण्यात आले. त्यानंतरही परिस्थिती कायम राहिल्याने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

बुधवारी विधानसभेत नाणारविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. नाणारला विरोध करण्यासाठी कोकणातील नागरीकांनी नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढला होता. या नागरीकांच्या भावना लक्षात घेऊन शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. त्यावेळी 293 च्या प्रस्तावावरील उत्तर झाल्यावर बोलायला देतो, अशी सूचना अध्यक्षांनी केली. मात्र, यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमकपणा घेत सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज दुसऱ्या दिवशी झाली.

गुरुवारी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नाणार प्रकल्पावर चर्चा करण्याची मागणी केली. विखे-पाटील यांच्या मागणीला पाठींबा देत अन्य सदस्यांनीही हीच मागणी केली आणि गोंधळाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. यावर शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 10 मिनीटे कामकाज तहकूब केले होते.

त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी पाटील यांच्या स्थगन प्रस्तावाला समर्थन देत शिवसेनेला राजकीय मुद्दा न करता कोकणच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी एकत्रित वेलमध्ये येऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला. यामुळे संतप्त विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम होता. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सदस्यांच्या जोडीला शिवसेनाही उतरली. वेलमध्ये उतरून या सर्वांनी नाणार रद्द झालाच पाहिजे, नाणार जाणार… अशा घोषणाबाजी केल्या.

या गोंधळामुळे पुन्हा एकदा कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू झाले, तेव्हाही नाणारविरोधी घोषणाबाजी सुरूच असल्याने पुन्हा 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ सुरूच होता. मात्र, तालीका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी गोंधळातच शासकीय विधेयकांना सुरुवात केली. अध्यक्षांनी गोंधळी आवाजाच्या मतदानाने तीन विधेयके मंजूर करून घेतली. मात्र, विरोधकांचा गोंधळ थांबवण्याचे नाव घेत नसल्याने शेवटी अध्यक्षांनी दुपारी 12.30च्या सुमारास सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)