“नाणार’चा पेच कायम…

नाणार प्रकल्पाचे संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्री म्हणतात प्रकल्प लादणार नाही, चर्चेने मार्ग काढू


गोंधळामुळे सलग तिसऱ्या दिवशीही विधानसभेचे कामकाज बंद

नागपूर – राज्याच्या व कोकणाच्या विकासाला गती देण्यासाठी हा प्रकल्प झाला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, स्थानिक शेतकरी, नागरीक, सहकारी पक्ष, विरोधी पक्ष आदी सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयाने चर्चा करूनच नाणारबाबतचा तोडगा काढला जाईल.

हा प्रकल्प कोणावर लादला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही विधानसभेत पेच कायम होता. हा विनाशकारी प्रकल्प कोकणात नकोच, नाणार प्रकल्प तसेच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी, अशी भूमिका घेत सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी बाकवरील कॉंग्रेस-राष्ट्रवादीने गदरोळ केल्याने सभागृहात गोंधळ उडाला. या गोंधळात कामकाज तीनवेळा तहकूब करूनही गोंधळ आणि घोषणाबाजी कायम राहिल्याने शेवटी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. नाणारच्या मुद्यावर आज सलग तिसऱ्या दिवशी विधानसभा ठप्प पडली.

नाणार प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने गेले दोन दिवस विधानसभेचे कामकाज ठप्प झाले आहे. आज प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नाणारचा मुद्दा उचलून धरला. विधानसभेत गेले दोन दिवस नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यावर निवेदन करावे अशी मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच प्रतिसाद देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोकणावर नाणार प्रकल्प लादला जाणार नाही, सर्वांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाबाबत निर्णय करू. देशाची इंधन सुरक्षा व आयात-निर्यातीच्या दृष्टीने पश्‍चिम किनारपट्टीवर रिफायनरी उभी करणे आवश्‍यक व देशहिताचे असल्याचे सांगितले.

3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होणार असून हा देशातील आजवरचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात व आंध्रप्रदेश उत्सुक होते. परंतु केंद्राने महाराष्ट्राला पसंती दिली. गुजरामधील जामनगर येथे अशी रिफायनरी असून त्याचा पर्यावरणावर कोणताही परिणाम झालेला नाही.

आंब्याची सर्वाधिक निर्यात सध्या तेथून होते. ही तर अत्याधुनिक अशी ग्रीन रिफायनरी असून त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही. पर्यावरणाचे अत्यंत कठोर निकष असलेल्या सिंगापूर मध्येही अशीच रिफायनरी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाणारमध्ये प्रकल्प करण्याचे ठरले तेव्हा स्थानिकांचा फारसा विरोध नव्हता. परंतु नंतर गैरसमज पसरवले गेले. शिवसेनेने ही प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा करून याबाबतची फाईल माझ्याकडे पाठवली आहे. त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांसमोर, तसेच स्थानिक लोकांसमोर प्रकल्पाबाबतचे सादरीकरण करून त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार आहे. समृद्धी महामार्गालाही प्रथम विरोध झाला होता. मात्र नंतर हा विरोध मावळला व जमिनी देण्यासाठी स्वत:हून शेतकरी पुढे आले, नाणारबाबतही तसे होऊ शकते. मात्र जोवर सगळ्यांची संमती मिळत नाही तोवर या प्रकल्पाचे काम पुढे नेले जाणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या विस्तृत स्पष्टीकरणानंतरही शिवसेना व विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली. तर कॉंग्रेसचे जेष्ठ सदस्य व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना, मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र व मारिन अकादमी गुजरातला पळवली मग हा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे औदार्य का दाखवले जातेय असा प्रश्न उपस्थित केला.

शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी शिवसेनेने सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध असून तो रद्द करावा अशी मागणी केली. तर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुळगुळीत उत्तरे देत असल्याचा आरोप करत, प्रकल्प राहणार की जाणार ते सांगा असा आग्रह धरला. दरम्यान अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढील कामजाज पुकारल्याने शिवसेना व विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषनाबाजी सुरु केली. तीन वेळा कामकाज तहकूब करूनही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर सभागृह सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

नाणारवरून सभागृहातील गदारोळ कायम राहिल्याने शेवटी गोंधळात नगरविकास, महसूल आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची विधेयके मांडण्यात आली.या गोंधळातच ग्रामविकास विभागाचे सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्यात आले. तत्पूर्वी , गोंधळाच्या वातावरणात लोकलेखा समितीचा अहवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडला. गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज आज अवघे 2 तास 22 मिनिटे चालले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)