नाझरेतील पाण्याचे काटेकोर नियोजन

  • शाखाअभियंता चौलंग यांची माहिती; 31 टक्के पाणीसाठा

जेजुरी – नाझरे (मल्हारसागर) जलाशयात 31 टक्के पाणीसाठा असून 788 दशलक्ष घनफुट साठवण क्षमता असलेल्या धरणात 382:72 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा आहे. उन्हाळी पिकांच्या एका आवर्तनासह, मे महिन्यापर्यंत उपसा सिंचन योजना व जेजुरी औद्योगिक वसाहतीसह जलाशयावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याचे 30ऑक्‍टोबर अखेर पर्यंत नियोजन केल्याचे तसेच गतवर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे नाझरे शाखाअभियंता एस.जी.चौलंग, वरिष्ठ लिपिक विश्वास पवार यांनी सांगितले.
जेजुरी औद्योगिक वसाहत, जेजुरी शहर, मोरगावसह 16 गावे, नाझरे प्रादेशिक 5 गावे आदीं गावांच्या पिण्याच्या योजना नाझरे जलाशयावर कार्यान्वित आहेत. पाणी पुरवठा योजनेतील पारगाव-माळशिरस प्रादेशिक मधील 23 गावांचा वीजपुरवठा थकीत विजबिलामुळे गतवर्षी खंडित करण्यात आल्याने ही योजना बंद आहे. केवळ कोळविहिरे गावाची पिण्याचे पाण्याची योजना सुरू आहे.
उन्हाळी पिकांना जलाशयातून आवर्तन व उपसा सिंचन बाबत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.21) नाझरे पाटबंधारे शाखा कार्यालयात लाभार्थी गावांमधील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माहिती देताना नाझरे शाखाअभियंता चौलंग म्हणाले की, जलाशयावरील लाभार्थी असलेल्या नाझरे क.प., मावडी, जवळार्जुन या गावांना उन्हाळी हंगामातील उभ्या पिकांसाठी दि. 29मार्चला सकाळी कालव्याद्वारे आठ दिवसांचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी 30 दशलक्षफुट पाणीसाठा खर्च होणार आहे तसेच दि. 25मे पर्यंत उपसा सिंचन योजना कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. सिंचन योजनेसाठी 40 दशलक्ष घनफुट पाणी खर्च होईल. उपसा सिंचन योजना, उन्हाळी पिकांना आवर्तन आदींसह दि. 30ऑक्‍टोबर पर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे.
बैठकीस बापूराव भोर, जनार्दन टेकवडे, सुदामराव टेकवडे, सोमनाथ साळुंखे, रामभाऊ राणे, सुकुमार भामे, हनुमंत चाचर, प्रभाकर कापरे, रोहिदास खैरे, संतोष नाझीरकर, जालिंदर वायसे, उत्तमराव जगताप आदी उपस्थित होते.

  • बिच नाही, जलाशय असल्याचे भान ठेवा….
    जेजुरीच्या खंडोबाला दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. हे भाविक कऱ्हा स्नानासाठी हमखास जलाशयावर येतात. भाविकांनी हा बिच नाही, जलाशय असल्याचे भान ठेवावे. कारण, भाविक आपली वाहने थेट पाणलोट क्षेत्रात आणतात. येथेच जागरण-गोंधळ, कुलधर्म-कुलाचार आदी धार्मिक विधींची सुमारे 30 ते 40 दुकाने (मंडप) थाटल्यामुळेही पाणी प्रदूषित होत आहे. कपडे, निर्माल्य, प्लाष्टिक पाण्यात विसर्जित केले जाते तसेच वाहने धुण्याचे प्रकारही येथे घडत आहेत. पाणलोट क्षेत्रात मोठे खड्डे आहेत, भाविकांना याची कल्पना नसते त्यामुळे बुडून अथवा गाळात रुतून मृत्यूच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पाटबंधारे शाखेकडे कर्मचारी कमी असल्याने कारवाईस मर्यादा येतात. त्यामुळे या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेणार असल्याचे शाखा अभियंता चौलंग यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)