नागरी सुविधांसाठी? छे, ही तर निवडणुकीची तयारी!

लष्कर हद्दीत अधिकार वाढविण्याची लोकप्रतिनिधींची राजकीय खेळी

– गायत्री वाजपेयी

-Ads-

पुणे – लष्कराच्या अखत्यारीत असणाऱ्या नागरी क्षेत्राचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे अधिकार वाढविण्याबाबत संरक्षण मंत्रालयातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रालयाने नियुक्त केलेल्या केंद्रीय समितीने नुकतेच पुणे कॅन्टोन्मेंटला भेट देत, तेथील पाहणी केली. यावेळी अधिकार वाढविण्याबाबतचा प्रस्ताव बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनी या समितीला दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वासही लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत.

“लष्कराच्या अखत्यातील नागरी क्षेत्रांच्या सुविधा आणि कॅन्टोन्मेंट कायद्यातील दुरूस्तीची गरज’ याबाबत अभ्यास करण्यासाठी नुकतेच एका केंद्रीय समितीने पुण्यातील कॅन्टोन्मेंटस्‌ची पाहणी केली. यावेळी बोर्डाच्या लोकप्रतिनिधींचे अधिकार वाढवून प्रत्येक प्रतिनिधीला “विशेष निधी’ मिळावा, असा प्रस्ताव या समितीसमोर मांडण्यात आला आहे. पुढील चार महिन्यांत याबाबतचा सविस्तर अहवाल समितीतर्फे सादर केला जाणार आहे. मात्र, हा सर्व खटाटोप केवळ नागरी समस्यांविषयीचा प्रयत्न नसून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचे बोर्डातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जास्त आहेत. याठिकाणी भाजपचे बहुमत आहे. इतकेच नव्हे, तर बोर्डाच्या उपाध्यक्षपद पक्षाच्या प्रियंका श्रीगिरी यांच्याकडे आहे. अशावेळी संरक्षण मंत्रालयाच्या सकारात्मक निर्णयामुळे आगामी निवडणुकांसाठी याठिकाणी भाजपला नक्कीच फायदा मिळेल. त्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या अधिकार वाढविण्याबाबत मंत्रालय सकारात्मक असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मात्र, सध्या बोर्डातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार लष्कराकडे आहे. या निर्णयामुळे बोर्डातील लष्कराचे अधिकार कमी करून लोकप्रतिनिधींचे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात लष्कर परिसरातील सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता लष्करी अधिकारी वर्तवित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)