नागरी सहकारी बॅंकांनी कार्यक्षमता वाढवावी: रिझर्व्ह बॅंक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्‍यकता 
नवी दिल्ली: नागरी सहकारी बॅंकांनी आपल्या कारभार आणि व्यवस्थापन पद्धतीत आमूलाग्र सुधार केला तरच ग्राहकांचा त्या विश्वास कमावू शकतील असे रिझर्व्ह बॅंकेने मत नोंदविले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर व्ही. एस. विश्‍वनाथन म्हणाले, 2002 सालातील काही घोटाळ्यापश्‍चात नागरी सहकारी बॅंकांचा प्रगतीचा आलेख मंदावला. एकूण बॅंकिंग क्षेत्रात त्यांचा वाटा 2002-03 सालातील 6.4 टक्‍क्‍यांवरून, 2016-17 मध्ये 3.3 टक्‍के इतका घसरला आहे. गुजरात राज्य नागरी सहकारी बॅंक महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना विश्‍वनाथन यांनी ही टिप्पणी केली आहे. नागरी सहकारी बॅंकांच्या कारभारात व्यावसायिक निपुणता आणली जावी. यासाठी रिझर्व्ह बॅंकेने मालेगाम समितीच्या शिफारशीनुसार, संचालक मंडळाव्यतिरिक्त तज्ज्ञ व्यवस्थापन मंडळ स्थापणे अनिवार्य करणारा प्रस्ताव पुढे आणला आहे.
बॅंकांच्या कारभारात व्यावसायिकतेचा अभाव ही नागरी सहकारी बॅंकांपुढील प्रमुख समस्या असून, त्याबाबत प्राधान्याने पावले टाकली जायला हवीत, असा विश्‍वनाथन यांनी आपल्या भाषणात पुनरूच्चार केला. या बॅंकांवर असणारे दुहेरी नियंत्रण पाहता रिझर्व्ह बॅंकेला या आघाडीवर फारसे काही करता आलेले नाही आणि या समस्येबाबत आपण हतबल आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यासाठी व्यवस्थापन मंडळाचा प्रस्ताव पुढे आणला गेला असल्याचेही त्यांनी नमूद केले. जेणेकरून सहकार कायद्यातील तत्त्वांचे पालन आणि बॅंकेचा प्रत्यक्ष कारभार या दोन भूमिकांमध्ये फारकत केली जाऊन, त्यांचे दायित्वही निश्‍चित केले जाऊ शकेल.
रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंकांची विश्‍वासार्हता वाढीस लागावी यासाठी आजवर अनेक पावले टाकली. राज्यांबरोबर त्रिपक्षीय करार करून बहुतांश राज्यात कार्यान्वित करण्यात आलेले विशेष कृती दल (टास्क फोर्स) हा त्यापैकी सर्वात प्रभावी उपाय ठरला आहे, अशी त्यांनी पुस्ती जोडली. रिझर्व्ह बॅंकेच्या उपाययोजनेच्या परिणामी मुख्य भागभांडवल 3 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असलेल्या 2008 साली 224 नागरी बॅंका होत्या, ही संख्या 2013 मध्ये 160 आणि 2017 अखेर आणखी कमी होऊन 114 वर आली. छोट्या रकमेच्या कर्ज वितरणाच्या व्यवसायात असूनही सकल अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) 7 टक्‍क्‍यांच्या घरात असणे समर्थनीय नाही, असे ते म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)