नागठाणे परिसरात होतोय वारंवार विद्युत पुरवठा खंडित

नागरिकांमध्ये असंतोष ; पाणी पुरवठा योजनांना फटका

नागठाणे – सातारा तालुक्‍यातील नागठाणे परिसरातील गावांमधून वारंवार होणाऱ्या विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे येथील नागरिक, व्यापारी व शेतकरी वर्गांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजनांना फटका बसत असून जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच शासकीय, निमशासकीय कार्यालयानांही याचा मोठा फटका बसत आहे.

-Ads-

कार्यालयाची महत्वाची कामे खोळंबून रहात आहेत. विद्युत वितरण कंपनीने येथील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अन्यथा येथील जनतेच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल अशी भावना येथील जनतेतून व्यक्त होत आहे. नागठाणे परिसरातील गावांना अतीत येथील विद्युत फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. यामध्ये अतीत, नागठाणे, काशीळ, बोरगाव, निसराळे, खोजेवाडी, अपशिंगे (मि.), अतीत, समर्थगाव अशा सुमारे 25-30 गावांना विद्युत पुरवठा होतो.

गेल्या 2-3 वर्षांपासून या फिडरमधून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरावठ्यामुळे येथील जनता अक्षरश: वैतागली आहे. सध्याच्या हंगामात ज्वारी, ऊस, गहू यांसह इतर बागायती पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. खंडित होणाऱ्या विजपुरवठ्याने शेतीला पाणी देण्याचे नियोजन विस्कळीत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून देखील पिकांना योग्य पद्धतीने पाणी देता येत नाही. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत आला आहे.

भारनियमन व त्यातच वारंवार वीज वितरण कंपनीचे होणारे घोटाळे यामुळे शेतीची तसेच इतर कामे करणे जिकरीचे होऊन बसले आहे. येथील गावांमधील सर्वच पाणीपुरवठा योजना या वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरावठ्यामुळे सतत बंद पडत आहेत. त्यामुळे पाणी असूनही येथील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा रोष मात्र ग्रामपंचायतीला भोगावा लागत आहे. नागठाणे, अतीत, बोरगाव, काशीळ ही महामार्गावरील बाजारपेठेची गावे आहेत. या खंडित विजेमुळे येथील व्यापारी वर्गही हैराण झाले आहे.

या परिसरात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये आहेत. सध्या शासनाने सर्व कार्यालये ऑनलाइन पध्दतीने परिपूर्ण केली आहेत. मात्र, त्यांनाही या खंडित विजपुरावठ्याचा मोठा फटका बसत असून सर्व ऑनलाईन व्यवहार रोजच ठप्प होत आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व सबस्टेशन मध्ये अतीत सबस्टेशन वीज बिल कलेक्‍शनमध्ये कायम वरच्या क्रमांकावर राहिले आहे. मात्र येथील जनतेला सुरळीत वीजपुरवठा देण्यात मात्र कायम खालच्या क्रमांकावर राहिले आहे.

या होणाऱ्या खंडित विजपुराठ्याबाबत येथील जनतेने वेळोवेळी निवेदने, आंदोलने केली. मात्र, याचा काडीमात्र फरक येथील कारभारावर पडला नाही. त्यामुळे येथील जनतेत वीज वितरण कंपणीबाबत चांगलाच असंतोष पसरला आहे. लवकरात लवकर अतीत सबस्टेशनने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही व या भागातील गावांना अखंडित वीजपुरवठा केला नाही तर त्यांना येथील जनतेच्या तीव्र रोषाला लवकरच सामोरे जावे लागले असेच वातावरण सध्या येथील जनतेत निर्माण झाले आहे.

नागठाणे गाव सुमारे 15 हजार लोकसंख्येचे आहे. गावाला विविध ठिकाणावरून पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठा स्कीमवर वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा मोठा परिणाम होत आहे. वीज मंडळाच्या या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांच्या रोषाला मात्र ग्रामपंचायतीला हकनाक सामोरे जावे लागत आहे. 
विष्णू साळुंखे-पाटील 
सरपंच, नागठाणे, ता. सातारा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)