नाओमी ओसाकाला महिलांचे जेतेपद 

रशियाच्या दारिया कासत्किनावर एकतर्फी मात 
इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा 
इंडियन वेल्स – एकामागून एक सनसनाटी विजयांची नोंद करीत अंतिम फेरी गाठणाऱ्या रशियाच्या दारिया कासत्किनाचे आव्हान सरळ सेटमध्ये मोडून काढताना जपानच्या नाओमी ओसाकाने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. एकतर्फी ठरलेल्या अंतिम सामन्यात ओसाकाने कासत्किनाचा 6-3, 6-2 असा पराभव केला.
उपात्य फेरीच्या सामन्यात दारिया कासत्किनाने आठव्या मानांकित आणि सर्वाधिक वयस्कर महिला टेनिसपटू व्हीनस विल्यम्सवर 4-6, 6-4, 7-5 असा विजय मिळवताना अंतिम सामन्यात धडक मारली होती. तसेच उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बिगरमानांकित नाओमी ओसाकाने खळबळजनक विजयाची नोंद करताना अग्रमानांकित सिमोना हालेपला 6-3, 6-0 असे चकित करताना अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे या दोन्ही 20 वर्षीय तडफदार खेळाडूंपैकी कोण इंडियन वेल्सचे जेतेपद पटकावणार, याची उत्सुकता टेनिसप्रेमींना होती.
अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीपासूनच एकमेकांवर वरचढ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु या प्रयत्नांत नाओमी यशस्वी ठरली, तर दारियाला या सामन्यात सूरच गवसला नाही. त्यामुळे सामन्याच्या पहिल्याच सर्व्हिसपासून नाओमीने दारियावर दडपण आणले. पहिल्यापासून दारियाला चुका करण्यास भाग पाडताना नाओमीने पहिला सेट 6 विरुद्ध 3 अशा फरकाने आपल्या नावे केला.
नाओमीवे या सामन्यात हालेपविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच रणनीती आखत दारियावर वर्चस्व गाजवले त्यामुळे दारियाला पहिल्या सेटमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि तिने हा सेट गमावला. पहिला सेट गमावल्यामुळे दडपणाखाली असलेल्या दारियावर दुसऱ्या सेटमध्ये देखील वर्चस्व गाजवीत नाओमीने हा सेट 6 विरुद्ध 2 असा जिंकून जेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.
महिला दुहेरी स्ट्रायकोव्हा-सू वेई हसिह विजेत्या 
बार्बरा स्ट्रायकोव्हा आणि सू वेई हसिह या सहाव्या मानांकित जोडीने एकेटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना या अग्रमानांकित जोडीवर 6-4, 6-4 अशी सनसनाटी विजयाची नोंद करताना महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीत जॉन इस्नर व जॅक सॉक या बिगरमानांकित जोडीने विजेतेपदाचा मान मिळविला. जॉक सॉक व जॉन इस्नर यांनी अंतिम सामन्यात बॉब ब्रायन व र्माक ब्रायन या सातव्या मानांकित जोडीचा 7-6, 7-6 असा पराभव केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)