नांदेड विद्यापाठाला 6 कोटी रूपयांचा निधी मंजूर

नांदेड – केंद्रशासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला 6 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानमार्फत विद्यापीठाच्या भौतिक सुविधेसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यापैकी विद्यापीठास नवीन बांधकामासाठी 2.10 कोटी रुपये, नूतनीकरण व दर्जा सुधारण्यासाठी 2.10 कोटी आणि विविध उपकरणे खरेदीसाठी 1.80 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

यानिधीमुळे विद्यापीठातील भौतिक तसेच शैक्षणिक सुविधेमध्ये वाढ होणार आहे. रुसा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र समिती असणार आहे. या समितीचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे अध्यक्ष तर प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी हे सचिव असणार आहेत. तसेच विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि विद्यापीठ अभियंता अरुण पाटील हे सदस्य असणार आहेत.

रुसा अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या 251 कोटी रुपयाच्या आराखड्यास सप्टेंबर 2015 मध्ये प्रकल्प मंजुरी मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामध्ये राज्यातील नऊ विद्यापीठे आणि पाच शासकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. याअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला निधी मंजूर झाला आहे. यानिधीमुळे विद्यापीठाच्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधेमध्ये चांगली प्रगती साधता येईल, अशी आशा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)