नांदेड : लिंगायत समन्वय समितीचे राज्यभर निषेध आंदोलन

नांदेड  : कोट्यवधींच्या संख्येत असणाऱ्या तसेच कोणत्याही निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या  राज्यातील लिंगायत समाजाची दिशाभूल करणाऱ्या तसेच विधिमंडळात समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या  देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करण्याचा निर्णय लिंगायत समन्वय समितीने घेतला आहे. दि. १७  ते २३ मार्च दरम्यान  राज्यभरात सगळीकडे निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे  राज्य समन्वयक माधवराव पाटील टाकळीकर यांनी दिली.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध प्रांतात लिंगायत समाज मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहे. महाराष्ट्र , कर्नाटकासह अनेक राज्यात या समाजाचे संख्याबळ अक्षरशः  निर्णायक  ठरणारे आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता देण्यात यावी, यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. या मागणीसाठी देशपातळीवर भव्य महामोर्चेही काढण्यात आले आहेत . राज्य मंत्री मंडळाच्या २६ ऑगस्ट २०१४ च्या बैठकीत राज्य शासनाकडून लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यासंदर्भातील  प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय झालेला असतानाही फडणवीस सरकार त्याबाबतीत लिंगायतांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे.

केवळ समाजाची दिशाभूलच नव्हे तर समाजाला अवमानित करण्याचे कामही केले जात आहे.  राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केले आहे. याबाबत विनोद तावडे यांनी लिंगायत धर्मियांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही लिंगायत धर्मियांकडून केली जात आहे.

राज्य शासनाने केंद्राकडे  धर्म मान्यता  व अल्पसंख्यांक दर्जा मिळण्याबाबतचे  निर्देश दिलेल्या प्रस्तावातच लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म असल्याचे तसेच स्वतंत्र धर्म म्हणून अस्तित्वात असल्याबाबतचे सर्व पुरावे जोडण्यात आलेले आहेत. याचा कुठलाही विचार न करता वीरशैवांचा मुद्दा पुढे करून त्यासंबंधीच्या पत्राचा उल्लेख करून हे सरकार लिंगायत धर्मियांची दिशाभूल करीत आहे. त्याबद्दल राज्यभर १७  ते २३ मार्च २०१८  दरम्यान लोकशाही पध्दतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. संबंधित समाज बांधवांनी आपआपल्या जिल्हाधिकारी – तहसिल –  नगर परिषद  – नगर पंचायत – ग्राम पंचायत  या सर्व ठिकाणी लोकशाही पद्धतीने फडणवीस सरकारचा निषेध करावा, असे आवाहनही माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)