नांदेडमध्ये अवतरलेत पालीचे ‘गणपती बाप्पा’

नांदेड – अष्टविनायकांपैकी एक आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पालीचे गणपती बल्लाळेश्वर नांदेड शहरात अवतरले आहेत. येथील प्रसिद्ध मूर्तीकार तथा सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयातील राजेश्वर पापनवार यांनी बाप्पांचे हे साजिरे रूप तयार केले आहे. शासकीय विश्रामगृह परिसरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर नांदेड शहरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या रूपातील गणपती बाप्पांचे दर्शन होत आहे. सा.बां. मंडळ कार्यालयात सहाय्यक आरेखक असलेले राजेश्वर पापनवार यांनीही आपल्यातील कला जागवत बाप्पांचे अनोखे रूप कलाकृतीतून जागृत केले आहे. मूळचाच कलावंताचा पिंड असलेल्या राजेश्वर यांचे बॅचलर ऑफ फाइन आर्टस्‌पर्यंत शिक्षण झाले आहे. गेल्या 35 वर्षांपासून पापनवार यांनी आपल्या मूर्तीकलेचा छंद जोपासला आहे. पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहशिक्षक असलेले त्यांचे बंधू बालाजी पापनवार हेदेखील मातीकामाचा छंद जोपासतात. दोन्ही भावांनी एकमेकांच्या संकल्पना प्रत्यक्ष उतरवत यंदा पालीचा बल्लाळेश्वर नांदेडकरांसाठी साकारला आहे.

गणरायाचे आगमन होण्याच्या अवघ्या 6 दिवस आधी पापनवार बंधूंनी बल्लाळेश्वराची मूर्ती साकरण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी लागणारे साहित्य, रंगांची जमवाजमव केली. दोन्ही भावांनी आपापला व्यवसाय सांभाळत या मूर्तीला बल्लाळेश्वराचे रूप दिले. पाली देवस्थानची मूर्ती कशी दिसते, त्याचा रंग, रचना, मूर्तीचे भाव आणि भाविकांना प्रसन्न करणारे मोहक रूप याचर पापनवार बंधूंनी भर दिला.

वडिलोपार्जित असलेला मूर्तीकामाचा व्यवसाय अजूनही सुरू आहे. पापनवार कुटूंबाने आतापर्यंत विविध 13 हजारांवर मूर्ती साकारल्या आहेत. यात यंदा मोंढा परिसरात गणरायासमोर स्थापन करण्यात आलेली 11 तोंडी नागाची मूर्ती आणि यापूर्वी साकारलेली भगवान दत्तात्रयाची साडेबारा फूट उंचीची मूर्ती आपल्याला विशेष भावल्याचेे पापनवार यांनी सांगितले.

फक्त मूर्ती कामावर न थांबता राजेश्वर पापनवार यांनी सामाजिक जाणीव ठेवत विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणरायाची मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. पापनवार कुटूंबाची मूर्तीकला आता पुढच्या पिढीतही हस्तांतरित होत आहे. त्यांच्या कुटूंबातील इयत्ता तिसरीत शिकणारा छोटा अर्णव आणि आर्यनदेखील गणराच्या विविध मूर्ती लिलया साकारतो. येत्या काळात इको फ्रेंडली मूर्ती साकारण्याचा मानस असल्याचे राजेश्वर पापनवार यांनी सांगितले.

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाने आमच्यासारख्या कुटूंबाला मूर्तीकलेचा आशीर्वाद दिल्याचे पापनवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)