नांदेडमधील फरार कैदी हिंगोली शहर पोलिसांनी पकडला

नांदेड – काल मध्यरात्री दवाखान्यात उपचार घेणारा नांदेड जिल्ह्यातील शिक्षा भोगणारा गुन्हेगार पळून गेला होता. त्यास आज दुपारी हिंगोली शहर पोलिसांनी हिंगोलीच्या बसस्थानकाजवळ एका कारसह पकडले आहे.

अधिक माहिती अशी की, 28 ऑगस्टच्या रात्री दिड वाजता सरदूलसिंघ अमरसिंघ फौजी उर्फ शाहू (30) हा शिक्षाबंदी क्र.1348 पोटातील आजारासाठी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून गेला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत वरिष्ठ पातळीवरुन या पळून गेलेल्या सरदूलसिंघ नावाच्या गुन्हेगाराचा शोध सुरु झाला. अनेक बिनतारी संदेश केले. काही पथके रवाना झाली, पण तो काही सापडला नाही.

आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांना त्यांच्या एका माहितगाराने एक इंडिका कार बसस्थानकाजवळ बेवारस अवस्थेत बऱ्याच वेळची उभी असल्याची माहिती दिली. अशोक मैराळ यांनी त्वरित प्रभावाने पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस कर्मचारी राठोड, सुपेकर, जाधव आणि दंडगे यांना तिकडे पाठविले. पोलिसांचा ताफा हिंगोली बसस्थानकात गेला तेंव्हाच सरदूलसिंघ त्या कारमध्ये बसत होता. त्या कारच्या नंबर प्लेटवर चिखल फासलेला होता. पोलिसांनी याची तपासणी केली असता त्यांना कारमध्ये हातकड्या दिसल्या आणि पोलिसांचा त्या माणसावर संशय बळावला.

पोलिसांनी त्याची सविस्तर चौकशी केली असता त्याने आपण पळून आलेले कैदी असल्याचे सांगितले. सोबतच हिंगोली पोलिसांनी नांदेड पोलिसांना विचारुन त्यांना सांगितले की, सरदूलसिंघ अमरसिंघ फौजी उर्फ शाहू हा माणूस एमएच-20-वाय-9575 या गाडीमध्ये आम्हाला सापडला आहे. तेंव्हा नांदेड पोलिसांनी हा पळून गेलेला गुन्हेगार असल्याची माहिती हिंगोली पोलिसांना दिली. नांदेडचे पोलीस पथक सरदूलसिंघला आणण्यासाठी हिंगोलीला रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)