नांदुर येथे तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील नांदुर येथे सोमवारी (दि. 25) पहाटे भुरट्या चोरांनी तीन बंदिस्त घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. नागरिक जागे झाल्याची चाहुल लागताच चोरट्यांनी पळ काढला. कळंब परिसरात गेल्या काही महिन्यांत झालेल्या चोऱ्यांचा तपास अद्याप लागला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई येथे स्थायीक असलेले उल्हास विठ्ठल चिखले, फकीरा देवराम वायाळ आणि योगेश गुलाब वायाळ यांच्या जुन्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले व कपाट उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना घडत असतानाचा आवाज झाल्याने शेजारील महिला जाग्या झाल्या. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. लगोलग वस्तीवरील नागरिक जागे झाल्याने चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. घटनेची माहिती पोलीस पाटील रविंद्र विश्‍वासराव यांनी मंचर पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, हवालदार राजेंद्र हिले यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांना गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुन त्याद्वारे गावात तरुणांनी गस्त घालावी. त्यामुळे गावात होणाऱ्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवता येईल, असे आवाहन केले. घटनास्थळी उपसरपंच शेखर चिखले, मुक्तादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष अंकित जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश वायाळ, बजरंग वायाळ, संतोष भालेराव, संजय जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी भेटी देऊन पाहणी केली. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने गावोगावी कामगारांच्या टोळ्या कामासाठी आल्या आहेत. ते दिवसा काम करीत असताना बंदिस्त घराची पाहणी करुन रात्री त्या ठिकाणी चोरीचा सपाटा करतात. तरी ग्रामस्थांनी याबाबत जागरुक राहिले पाहिजे. प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली पाहिजे, असे मत आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी व्यक्त केले आहे.
मागील काळात काही दिवसांपूर्वी कळंब, एकलहरे परिसरातील वीस-पंचवीस ठिकाणी चोरट्यांनी बंदिस्त घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. तरी या घटनेचा तपास लावण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. गावोगावच्या वस्तीवरील नागरिकांनी बंदिस्त घरामध्ये मौल्यवान ऐवज ठेवू नये. गावामध्ये चोऱ्या होणार नाही. याकरिता गावातील नागरिकांनी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे गरजेचे आहे. ग्रामसुरक्षा दल हे गावच्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावण्याचे काम करीत असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)