बाजारपेठेत दर टिकून मात्र मागणी कमी; कारखान्यांना करावी लागणार साठवणूक
गोकुळ टांकसाळे
भवानीनगर- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची मागणी कमी असली तरी देशांतर्गत बाजारात साखरेचे दर टिकून आहेत. मात्र, अन्य राज्यांच्या 31 ते 32 रूपयाच्या तुलनेत महाराष्ट्रात साखर किलो मागे दोन रूपयांनी कमी आहे. त्यातच शासनाकडून साखरेचा उठाव अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यातच गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. गतवर्षीची शिल्लक साखर असताना नव्याने उत्पादित होणाऱ्या साखर पोत्यांची भर पडत असल्याने कारखान्यांची गोदामे भरू लागली आहेत. आगामी काळात साखरेच्या दराचा गोडवा टिकून राहिला तरच ही गोदामे रिकामी होतील.
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शंभर दिवसाचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. यात सुमारे 86 लाख 4 हजार 159 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून 94 लाख 34 हजार 780 क्विंटल साखर उत्पन्न घेतले आहे. जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी एक लाख साखर पोत्यांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यातच गतवर्षी चांगला दर नसल्याने सर्व साखर गोदामा बाहेर निघू शकली नाही, अशी साखरही काही प्रमाणात कारखान्यांकडे शिल्लक आहे. आता, नव्याने उत्पादीत साखर पोत्यांनी कारखान्यांची गोदामे भरू लागली आहेत.
सध्या, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर टिकून असताना तुलनेने निर्यात कमी आहे. याच कारणातून देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा साठाही वाढतो आहे. यातून मागणी कमी-अधिक होत असल्याने कारखान्यातील साखरेलाही उठाव कमी आहे. गाळप हंगाम अंतिम टप्याकडे असताना, कारखान्याची गोदामे भरू लागली आहेत. बाजारात साखर कमी जात असल्याने पोती ठेवण्यासाठी जागाही आता अपुरी पडू लागली आहे.
साखरेला पाहिजे तेवढा उठाव नसल्याने प्रत्येक कारखान्यासमोर नवीन समस्या उभ्या राहत आहेत. दररोज उत्पादित होणारी साखर कोठे ठेवावी? असा प्रश्न काही दिवसांनी कारखान्यांसमोर उभा राहणार आहे. निवडणुकीच्या हंगामात
जर साखर निर्यातीसंदर्भात केंद्राकडून दुर्लक्ष केले गेले तर कारखाने अडचणीत येवू शकतील. साखरेचे दर टिकून असले तरी मागणी नसल्याने साखर साठवून ठेवण्याशिवाय कारखान्यांपुढे पर्याय नाही. अशीच स्थिती कायम राहिली तर उसाला प्रतिटन भाव देताना पुन्हा “एफआरपी’चा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे. यामुळे साखरेचे भाव टिकून राहणे तसेच मागणी वाढणे, यावर आगामी काळाती गणिते अवलंबून आहेत.
- साखर साठवणे खर्चीक काम…
जिल्ह्यातील साखर कारखान्यांतून उसाचे गाळप मोठ्या प्रमाणात होत आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने चालणार आहेत. कारखान्यात जुनी आणि नवी अशी दोन्ही साखर पोती वाढू लागली आहेत. साखर साठवूण ठेवण्याकरिता चांगल्या दर्जाच्या पॉलिथीनच्या पिशव्या घेण्यासह अच्छादन, स्वच्छता या सारखे अन्य खर्चाची भर पडते. त्यामुळे साखर साठवून ठेवणे कारखान्यांनाकरिता तसे खर्चीक काम असते.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे उत्पादन….
कारखाना उत्पादन
कर्मयोगी सहकारी9,59,650 क्विं.
सोमेश्वर सहकारी7,10,650 क्विं.
छत्रपती सहकारी6,61,900 क्विं.
विघ्नहर सहकारी6,17,100 क्विं.
माळेगाव सहकारी5,56,500 क्विं.
भिमाशंकर सहकारी5,26,900 क्विं.
घोडगंगा सहकारी4,93,500 क्विं.
निरा भिमा सहकारी4,48,170 क्विं.
संत तुकाराम सहकारी3,94,875 क्विं.
भिमा पाटस सहकारी3,86,700 क्विं.
राजगड सहकारी1,27,300 क्विं.
बारामती अँग्रो9,21,150 क्विं.
दौंड शुगर्स8,00150 क्विं.
व्यंकटेशकृपा5,13,620 क्विं.
श्रीनाथ म्हस्कोबा4,83,835 क्विं.
परागअँग्रो फुडस4,59,030 क्विं.
अनुराज शुगर्स 3,34,450 क्विं.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा