नव्या राष्ट्रपतींबाबत चर्चेला उधाण

एकनाथ बागूल

 

भाजप आणि सर्व विरोधी पक्षाच्या दृष्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस असाधारण महत्व आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेला साथ देणारा नेता त्या पदावर विराजमान करण्याची जास्त गरज आहे. त्या दृष्टीने या पक्षाकडून वापर अप्रत्यक्षपणे होईल, अशीही भीती विरोधकांना वाटत आहे. तरी देखील सर्व विरोधकांचा संघटीत प्रयत्न भाजपच्या विरोधात महागठबंधन स्थापन करून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा अश्वमेघ अडवू शकेल
देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा निकाल अधिकृतरित्या 25 जुलै रोजी जाहीर होईल. त्याच दिवशी त्या सर्वोच्च सत्ताधारी पदावर कोण विराजमान होईल हे देशवासियांना समजू शकेल. मात्र या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये कोणते उमेदवार सहभागी होण्याची शक्‍यता आहे त्या नावांची आतापासून प्रसार माध्यमांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये उद्‌भवलेल्या अकाली दुर्दैवी मृत्यूनंतर कॉंग्रेस पक्षामध्ये त्यांच्या ऐवजी पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून पी.व्ही. नरसिंहराव, अर्जुनसिंग आणि शरद पवार या तीन नेत्यांच्या नावाची प्रामुख्याने सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. परंतु अर्जुनसिंग यांनी अचानक स्वत:चे नाव त्या शर्यतीमधून मागे घेतले. परिणामी त्या पदासाठी पक्षातील अंतर्गत स्पर्धेमध्ये नरसिंहराव आणि शरद पवार हीच दोन नावे शिल्लक उरली. उभय नेत्यांच्या पाठीराख्यांनी आपल्या नेत्यांच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न आरंभले. त्याचवेळी आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेतील चार राज्यातील एकंदर 85 कॉंग्रेस खासदारांनी नरसिंहराव यांच्या उमेदवारीस प्रकटपणे पाठींबा जाहीर केला. संबंधित खळबळजनक घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीमधील स्वत:चे नाव मागे घेतले आणि नरसिंहराव यांच्यासाठी पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा करून दिला. तत्कालिन राजकारणातील हे वास्तव विचारात घेतल्यानंतर शरद पवार वेळोवेळी पंतप्रधान बनण्याची जरी कोणाची इच्छा असली तरी त्यासाठी उमेदवाराच्या पाठीशी पुरेसे बहुमत असणे आवश्‍यक असते असे सांगू लागलो. आजही जेव्हा जेव्हा त्या पदाच्या उमेदवारीबाबत याच संदर्भात त्यांना प्रश्‍न विचारला जातो तेव्हा प्रत्येक वेळी पर्याप्त बहुमताच्या अभावाची अडचण आवर्जून नि:संकोचपणे निदर्शनास आणून देत असतात.
देशाचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. शिवाय राजकारणामधील नव्या अनेक आश्‍चर्यकारक बदलांमुळे शरद पवार यांनी स्वत: स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पसारा पश्‍चिम महाराष्ट्राबाहेर देखील भक्कमपणे वाढविता आलेला नाही. त्यामुळेच सध्या जरी आगामी राष्ट्रपती पदासाठी त्यांच्या नावाचा उल्लेख होऊ लागला असला तरी त्या संबंधीच्या शक्‍यतेला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्‍ते डी.पी. त्रिपाठी यांनी देखील मंगळवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बातचित करताना स्पष्ट शब्दात पूर्ण विराम दिला आहे. तथापी येथे सक्रिय राजकारणामध्ये सहभाग असणारे सर्व पक्ष किंवा त्यांचे नेते कायम स्वरुपात एकमेकांचे शत्रू किंवा मित्र नसतात. या प्रचलित सर्वश्रुत सूत्राचा त्रिपाठी यांनी यावेळी सूचक शब्दात उल्लेख केला तो विचारात घेतला तर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी बदलणारच नाही, असेही ठामपणे समजता येणार नाही. या संदर्भात त्यांनी सत्तारुढ भाजपला ही निवडणुक जिंकण्यासाठी 15हजार मतांची कमतरता आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्षांची मदत त्यांना तेथे द्यावी लागेल. मोठ्या खुबीने हे देखील लक्षात आणून दिले आहे. शिवाय याच संदर्भात माजी केंद्रीय मंत्री के.व्ही. थॉमस यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येण्याची सूचना केली ती त्रिपाठी यांनी तडकाफडकी फेटाळून लावल्याचे जे आढळले ते सुद्धा संबंधीत सर्व घडामोडींच्या दृष्टीने अर्थपूर्ण समजावी लागेल.
दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रपतीपदाच्या इच्छुकांच्या नावांमध्ये जनता दल (संयुक्‍त) पक्षाचे नेते खासदार शरद यांचे नाव पुढे आले असून राजकीय वर्तुळात चर्चेचा तो नवा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यापासून बहुजन समाज समाजवादी आणि कॉंग्रेस हे तीन विरोधी पक्षही राष्ट्रपतीपदासाठी सत्तारूढ भाजपच्या आघाडीच्या संभाव्य उमेदवाराशी संयुक्‍तपणे तुल्यबळ लढत देऊ शकेल अशा नेत्याच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप आणि सर्व विरोधी पक्षाच्या दृष्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस असाधारण महत्व आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेला साथ देणारा नेता त्या पदावर विराजमान करण्याची जास्त गरज आहे. त्या दृष्टीने या पक्षाकडून वापर अप्रत्यक्षपणे होईल, अशीही भीती विरोधकांना वाटत आहे. तरी देखील सर्व विरोधकांचा संघटीत प्रयत्न भाजपच्या विरोधात महागठबंधन स्थापन करून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा अश्वमेघ अडवू शकेल, असे वाटते.
देशातील दीडशे कोटी मतदारांच्या 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनमताचा कौल कसा असू शकेल हे देखील समजणे भाजपच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्वाचे ठरणार आहे.

1 COMMENT

  1. वरील स्पष्टीकरण वाचण्यात आले ज्यांना सहावे इंद्रिय नसते ते आपल्या घोटीव विचारातून वरील प्रकारचे विश्लेषण करतात हा प्रकार ह्या विषयावरील सर्वच वृत्तपत्रातून अधोरेखित झालेला पाहावयास मिळाला परंतु आज राजकारण हे प्रामुख्याने धंदेवाईक राजकारणात परिवर्तित होतासतानाचे पाहावयास मिळत असूनही ह्या दृष्टीकोनातून विश्लेषण होणे गरजेचे आहे परंतु तसे होताना दिसत नाही श्री मोदी ह्यांनी वेळोवेळी देशाचा खरा विकास हा आर्थिक विकासातूनच घडू शकतो हे वारंवार स्पष्ट केलेले आहें व त्याच बरोबर मी बनिया आहे व धंदा हा गुण आमच्या रक्तारक्ताचं भिनलेला आहे हे जगजाहीर केले असताना ते वरील पदासाठी त्यांच्या तालावर नाचणारच उमेदवार निवडण्याची शक्यता नाकारता येईल का ? अशावेळेस त्यांचा देश हिताचा विचार करता ते स्वताहाच्या राजकीय पक्षाला दुय्यम स्थान देण्याची शक्यता नाकारता येईल का ? त्याच बरोबर आपले इस्पित प्रत्यक्षात कृतीत आयांसाठी लोकसभेत अथवा राज्यसभेत प्रत्येक विधेयक विरोध न होता मंजूर करवून घेण्याच्या हेतूने ते श्रीमती सोनिया गांधींचे नाव सुचविणाची श्यक्यता नाकारता येईल का ? असे केल्यास काँग्रेसमुक्त भारत हे त्यांचे स्वप्न जसे साकार होईल तसेच देशाचा उदयोगातून आर्थिक विकास करण्याचे त्यांचे ध्येय प्रत्यक्ष कृतीत उतरण्याची सिक्यता नाकारता येईलका ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)