नव्या योजना, उधळपट्टीवर “संक्रात’

आयुक्‍त सादर करणार कपातीचे अंदाजपत्रक

पुणे – महापालिकेच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकाची महापालिका आयुक्‍तांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आयुक्‍त सौरभ राव यांच्याकडून आपले पहिले अंदाजपत्रक येत्या 15 जानेवारीला मकरसंक्रातीच्या दिवशी सादर केले जाण्याची शक्‍यता असून हे अंदाजपत्रक वास्तववादी असणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकात नवीन योजनांसह अनेक उधळपट्टीच्या कामांवर “संक्रात’ येणार असल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2019-20 मध्ये महापालिकेच्या सर्व प्रमुख प्रकल्पांचे काम सुरू होणार आहे. त्यात नदीसुधार योजना, समान पाणी योजना, मेट्रो, कात्रज-कोंढवा रस्ता, शिवणे-खराडी रस्त्याचे उर्वरित काम यांसह अनेक प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे महापालिकेस या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद करावी लागणार आहे. त्यातच, महापालिकेचे 2018-19 चे अपेक्षित उत्पन्न जमा करण्यात महापालिकेस पहिल्या 9 महिन्यात यश आलेले नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्‍त राव यांनी या पूर्वीच अंदाजपत्रकातील उत्पन्नाचा फुगवटा लक्षात घेऊन महापालिका आयुक्‍तांनीच आढावा बैठकीत होणारे प्रकल्पच प्रस्तावित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आयुक्‍तांकडून या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करून अनावश्‍यक कामांना कात्री लावली जाणार आहे.

अंदाजपत्रक 15 जानेवारीला सादर
महापालिका आयुक्‍तांकडून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी 15 जानेवारी ही तारीख निश्‍चित करण्यात आली असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. ही तारीख स्थायी समिती अध्यक्षांनाही कळविण्यात आली आहे. महापालिका आयुक्‍त राव यांचे हे पहिले अंदाजपत्रक असून त्यावर महापालिकेच्या पुढील आर्थिक वर्षाची दिशा ठरणार आहे. तर, आयुक्‍तांनीच कपातीचे अंदाजपत्रक सादर केल्यास, स्थायी समिती अध्यक्षांचीही अडचण होणार असून त्यांनाही अंदाजपत्रक तोलून मापूनच करावे लागणार आहे.

सातव्या वेतन आयोगाचाही भार
राज्यशासनाने नुकताच सातव्या वेतन आयोगास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनीही हा वेतन आयोग लागू होणार असून पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च सुमारे 20 टक्‍के वाढणार आहे. तसेच हा आयोग 2016 पासून लागू होणार असल्याने या 3 वर्षांचा फरक टप्प्याटप्प्याने देण्यासाठी महापालिकेस आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. याचाही अंदाजपत्रकावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)