नव्या युगाची सावित्री

मनीषा संदीप

वाट पहाते पुनवेची हाती आरती सजली गं…
वर्षामागून वर्षाची परंपरा मी पुजली गं…!!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हो अर्थात हे सुमुधुर गीत आपल्या संस्कृती आणि परंपरेशी निगडित आहे… हिंदू पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणारी पहिली पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना यमराजाकडे करतात… यादिवशी वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, हे वरदान स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने मागत असतात…

छोट्या गावात आणि शहरातील काही भागात अजूनही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो…यानिमित्ताने अतिशय छान परंपरा आपण जपत असतो… आजचे युग आधुनिकतेचे आहे.. धावपळीचे आहे… स्त्रियां आता नोकरीच्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडतात… मग काही जणी अश्‍या सणांना फारसे महत्त्व देत नाहीत किंव्हा देऊ शकत नाही…

मग आपणच अशा रुढी परंपरेला अमान्य करू लागतो… त्याची खिल्ली उडवू लागतो पण हे खरेच जन्मोजन्मी एकच पती मिळावा यासाठीच आहे का फक्त.. त्यामागे पूवर्जांनी काहीच का विचार केला नसेल? कोणतेही व्रत किंवा सण साजरा करताना आपण तो श्रद्धेने जरूर करावा पण अंधश्रद्धेने किंवा त्याच्या मागचा उद्देश समजून न घेता करू नये. प्रत्येक सण आपल्याला एका ऋणामधून थोड्या का होईना प्रमाणात मुक्त करत असतो. मग निसर्गाचेही ऋण नको का फेडायला.

वटवृक्ष हा सर्वात जास्त आयुष्य असलेला वृक्ष आहेच, पण त्याचबरोबर सर्वात जास्त शुद्ध प्राणवायू देणारा ही आहे… जेव्हा तुम्ही अशा वटवृक्षाच्या छायेत जाता तेव्हा स्वतः दीर्घायुषी, प्रसन्न होताच आणि आपल्या कुटुंबालाही आरोग्य देण्याइतपत सक्षम होतात, पण मग बऱ्याच जणींना असा पण प्रश्न पडतो की मग तिकडे जाऊन फेऱ्या का मारायच्या, आपणच का हाच नवरा सात जन्म मागायचा.. त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपणच तिकडे का जायचे… तर त्याचे असे की पूर्वी स्त्रियांना बाहेर पडण्यासाठी फारशी कारणे नसायची.

त्या मानाने राजा महाराजा जंगलात शिकारीच्या निमित्ताने, सर्वसामान्य जनता उदरनिर्वाहाचे साहित्य गोळा करण्यासाठी तरी किमान निसर्गाच्या सानिध्यात असायची… पण स्त्रिया त्या मानाने फक्त चूल-मूल संसार यामध्येच अडकलेल्या असायच्या. मनाला प्रसन्न करण्याची फार साधने त्यांना उपलब्ध नसायची मग अशा सणांच्या निमित्ताने नटून थटून, त्या बाहेर पडायच्या.. मैत्रिणीसोबत सुख दुःख वाटत एकत्र जमायच्या.

तिथे भरपूर वेळ पूजेमध्ये घालवायच्या, त्याने फायदा असा व्हायचा की त्यांना पुरेसा शुद्ध प्राणवायू मिळाल्याने, प्रसन्न झाल्याने पुन्हा नव्या जोमाने उभ्या राहायच्या… आणि ही पूजा नवऱ्यासाठी केली जाते म्हंटल्यावर पुरुष मग तिला अडवत नसत…

पूर्वी अशी मोठी मोठी वृक्ष जंगलात, शेतात असायची एकटी दुकटी ती जात नसे नवरा मैत्रिणी यांच्यासोबतीने मग ती हे व्रत पूर्ण करायची त्यामुळे नवऱ्यालाही आरोग्य मिळायचे आणि असा निरोगी, प्रसन्न नवरा कोणाला नको असेल मग जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी ती प्रार्थना करायची…आताही परिस्थिती फार वेगळी नाही जरी थोडे फार बदलले असेल तरी…

आजची स्त्री ही बाहेर पडते, नोकरी करते, घर संसार सगळी तारेवरची कसरत करते तिला नवऱ्याकडून आता पूर्ण स्वातंत्र आहे.. पण ती स्वतःला अजूनही वेळ देत नाही.. म्हणून तिला अजूनसुद्धा गरज आहे या अशा मनाला उभारी देणाऱ्या सणांची आणि परंपरेची… आजकाल काही जणी वटवृक्षाची फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात हे फारच घातक आहे निसर्गासाठी आणि नकळत आपल्यासाठीही… मग ते न केलेले कव्हाही चांगले निदान आपल्या हातून निसर्गाची नासधूस तरी होणार नाही…

मान्य आहे घरातून सकाळी 6 वाजता बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना अशा प्रकारे यथासांग पूजा करता येत नाही, पण शक्‍य झाल्यास निदान त्या वटवृक्षाखाली 5 मिनिटे जरी जाऊन थांबले तरी त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केल्यासारखीच आहे. किंवा मग त्यानंतर एखाद्या सुट्टीच्या दिवशी नवऱ्याला घेऊन यथासांग पूजा करा.. परंपरा जपल्याचे समाधान आणि उत्तम आरोग्यही मिळेल… पण मैत्रिणींनो काय हरकत आहे एक दिवस स्वतःसाठी काढला तर.. मैत्रिणी, नटने मुरडणे, स्वतःचे लाड कौतुक करून घ्या की एक दिवस… नाही तरी रोजची धावपळ आहेच नंतर…

सर सलामत तो पगडी पचास तसेच आरोग्य असेल तर सब कुछ है… आणि मग अशी नटलेली थटलेली प्रसन्न, निरोगी बायको समोर पाहिली की कोणता नवरा म्हणणार नाही की हीच बायको जन्मोजन्मी मिळू दे…. तर चला मग स्वतःचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात स्वतःसाठीच घालवूया. निसर्गाचे आणि दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शरीराचेही थोडे ऋण फेडण्यास काय हरकत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)