… नव्या फळीतील कार्यकर्त्यांना संघर्ष नकोच

मानकुमरेंच्या विरोधात निवेदनाचा मार्ग; बदलत्या मुडचा फायदा सातारकरांना होणार

प्रशांत जाधव,सातारा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्याचे दोन्ही राजे म्हणजे तरूणांच्या मनात घर करून बसलेली व्यक्तीमत्वे. साताऱ्यासह राज्यात यांचा फॅन क्‍लब असल्याने त्यांच्या बाबतीतील एखादी गोष्ट म्हणजे, ती अखंड महाराष्ट्रातील तरूणांच्या अस्मितेचा प्रश्‍न असतो. तरूणांच्या याच अस्मितेमुळे साताऱ्यात उभा संघर्ष अनेकदा निर्माण झाला. दोन्ही राजेंच्यातील संघर्षाची सुत्रे असायची, ती कार्यकर्त्यांच्या हातात. दोन्ही राजेंच्यातील कोणाताही विषय असो, त्याची सुरूवात राजे करायचे पण शेवट कार्यकर्ते. मात्र काळ बदलला, अन्‌ नव्या पिढीतील कार्यकर्त्यांनी आता हा संघर्ष नको असल्याची भुमिका घेतल्याचे चित्र आहे.

साताऱ्याचे विद्यमान खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले व त्यांचे चुलत बंधु अन्‌ आमदार श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष जसा साताऱ्यासह महाराष्ट्राने अनुभवला अगदी त्याहून अधिक त्यांच्यातील जिव्हाळा महाराष्ट्राने अनुभवला. मात्र असे बोलले जाते की, या दोन्ही भावांत काही आपमतलबी लोकांनीच भांडणे लावली. ज्यामुळे या भानगडबाजांचे चांगलेच फावल्याची खंत काही कट्टर कार्यकर्ते खासगीत बोलतात.

दोन्ही राजघराण्यांचा संघर्ष फार पूर्वीपासूनचा आहे. मात्र नगरपालिकेच्या गत निवडणूकीच्या निमित्ताने दोन्ही राजे थोरल्या वाड्याच्या सल्ल्याने एकत्र आले. त्यानंतर सातारा पालिकेत जसा शांततेचा कारभार सुरू होता, अगदी तशीच शांतता साताऱ्यात होती. मात्र राजांच्या मनोमिलनामुळे आपली भाकरी करपण्याची भिती काहींच्या मनात निर्माण झाल्यानेच, दोन्ही राजांच्यात उभा संघर्ष निर्माण केला.

त्यानंतर ते अगदी काल परवा 2019 हे साल उजाडण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत सातारकरांच्या लाडक्‍या राजांचे वाद सुरूच होते. उजाडणारा दिवस जसा सारखा नसतो, तसेच येणारे 2019 सालही सातारकरांच्या मनाला सुखद धक्का देणारेच आले. खासदार आणि आमदार यांच्यातील संघर्षाची धार कमी नव्हे, तर संपल्याची चुणूकच या सालात सातारकरांना मिळाली. सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या समक्षच खासदारांनी बंधु आमदारांचे कोड कौतुक केले. खऱ्या अर्थाने तिथेच मनोमिलनाच्या नव्या पर्वाचा गार वारा साताऱ्यात वाहू लागला होता.

मात्र काही लोकांच्या कारनाम्याचे उपद्रव माहित असलेले सातारकर मनोमिलनाच्या या चर्चेबाबत सांशक होते. पण पुन्हा राजे आमनेसामने आले ते एकमेकांच्या फिटनेसची काळजी करूनच गेले. मोठ्या महाराजांनी धाकल्या महाराजांचा मिश्‍कीलपणे दाबलेला खांदा. तर तुम्ही माझा खांदा सारखा का दाबताय? असे म्हणत शिंवेद्रराजेंनी दिलेली दाद. यामुळे खऱ्या अर्थाने सातारकरांच्या अन्‌ उभ्या जिल्ह्याच्या खांद्यात बारा हत्तीचे बळ आल्याचे वास्तव आहे.

अगदी असाच पवित्रा कार्यकर्त्यांनीसुध्दा घेतला. दोन्ही महाराजांच्या चांगल्या वाईट प्रसंगात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या नव्या फळीतील कार्यकर्त्यांना आता हा संघर्ष कुठे तरी थांबावा असे वाटत आहे. नुकतेच दोन्ही राजे एकत्र येण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंत मानकुमरे यांनी जावली पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी, जावलीत उदयनराजेंचे काही चालत नसल्याचे मनोमिलनाला खिळ घालणारे वक्तव्य केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.

आता परत तोच जुना संघर्ष अन्‌ वादाची कटकट होणार, या भितीखाली सातारकर असतानाच, मोठ्या महाराजांच्या नव्या फळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी यांना निवेदने देवून मानकुमरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यामुळे दोन्ही महाराजांचे मनोमिलन या चर्चेपेक्षा नव्या फळीतील कार्यकर्त्यांच्या बदलत्या मानसिकतेचाच सातारकरांना हेवा वाटत आहे. यापुर्वी काही झाले तरी पेटुन उठणाऱ्या कार्यकर्त्यांना दोन्ही राजांच्या संघर्षाची झळ, नाही म्हटले तरी बसली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या बदलत्या मुडचा फायदा नक्कीच सातारकरांना होईल यात शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)