नव्या कोऱ्या तलावावर मनुष्यबळाची वाणवा

पिंपरी वाघेरे जलतरण तलाव : ऐन हंगामात गर्दीमुळे ताण
तलावायन – भाग 1

प्रशांत होनमाने
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी वाघेरे येथे वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आलेला जलतरण तलाव अत्याधुनिक आहे. मात्र, मनुष्यबळाची वाणवा असल्याने ऐन हंगामात तलावावर ताण येत आहे. लगतच्या परिसरात तलावाची सोय नसल्याने याठिकाणी मोठ्‌या प्रमाणावर गर्दी होत असून नागरीक तिकिटासाठी अक्षरशः तासन्‌तास रांगा लावत आहेत.

-Ads-

महापालिकेने पिंपरी वाघेरे जलतरण तलाव 10 एप्रिल 2017 रोजी सुरु केला. सध्या उन्हामुळे आणि शाळांना सुट्ट्या लागल्याने पोहण्यासाठी तरुणाईसह अबालवृद्धांचाही प्रचंड ओढा आहे. ऐन उन्हाळ्यात गर्दीने उच्चांक गाठला आहे. या ठिकाणी एप्रिल व मे असे दोन महिने जास्त गर्दी असते. मात्र थंडी व पावसाळ्यात या जलतरण तलावाकडे कोणीही फिरकत नाहीत अशी माहिती येथील व्यवस्थापकाने दिली. येथे नागरिकांसाठी एकूण 8 बॅचेस असून त्यातील 2 बॅचेस या केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही प्रचंड सहभाग दिसून येतो.

सध्या या जलतरण तलावात पोहण्यासाठी दिवसभरात सरासरी 900 ते 1000 नागरीक येतात. आता पोहण्यासाठीही लोकांना 18 टक्के जीएसटी टॅक्‍स भरावा लागत आहे. त्यामुळे सध्या प्रवेश घेताना जीएसटी कर भरावा लागत आहे. या ठिकाणी फायटर स्केट, ऍडव्हेंचर ऍण्ड स्पोर्ट्‌स, सिद्धार्थ स्पोर्ट्‌स या खासगी संस्था पोहण्यास शिकवण्याचे काम करत आहेत. मात्र या तलावावर काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरी गाव, पिंपरी कॅम्प, रिव्हर रोड, पिंपळे निलख या परिसरातून लोक येतात आहेत. त्यामुळे हा जलतरण तलाव हंगामात अपुरा पडत असल्याचे जलतरण व्यवस्थापक बाळू कापसे यांनी सांगितले.

स्थानिक गुंडगिरीचा त्रास
जलतरण तलावाच्या वापरासाठी गुंडगिरीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार याठिकाणी नियमित पोहण्यासाठी येणाऱ्या काही नागरिकांनी केली. राजकीय पुढाऱ्यांच्या ओळखीचा धाक दाखवून काही युवक तलाव परिसरात मनमानी करतात. सुरक्षा रक्षकाबरोबर वाद घालतात. तिकीट न काढताच प्रवेश देण्यासाठी दमदाटी करतात. काही महिन्यांपूर्वी यातील काही गुंडांनी वॉशरुममधील नळांची तोडफोड ककेली होती. हे टवाळखोर तलावाच्या तिकीटासाठी रांगेत थांबत नाहीत. तलाव परिसरात त्यांचा आरडाओरडा सुरु असतो. साफसफाई करण्याच्या वेळातही पोहण्याचा आग्रह करतात.त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाचीचे प्रकार घडतात. या टवाळखोरांना वेळीच आवर न घातल्यास विपरित घटना घडण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या मागण्या
– वाहनतळात वाहनांना सावलीसाठी शेड उभारावी
– तलाव परिसरात नागरिकांसाठी बाकडे व सावलीसाठी शेड उभारावी
– एप्रिल व मे महिन्यांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी
– येथील जीवरक्षक विभागाकडील बांबू व रिंगची संख्या वाढवावी
– सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी
– जलतरणपट्टूंना सरावासाठी स्वतंत्र बॅच असावी
– महिलांसाठी आणखी एक बॅच वाढवावी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)