नव्या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅबही ढासळला

महिला कर्मचारी जखमी

कामाचा दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह

पुणे :  उद्‌घाटनादिवशीच पाणी गळतीमुळे देशभर चर्चा झालेली पुणे महापालिकेची विस्तारीत इमारत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे महिला कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न चालविला असून ते कोणालाही कळू नये, यासाठी रात्री उशिरापर्यंत “खटाटोप’ सुरू होता.
उद्‌घाटनानंतर या इमारतीचे अर्धवट काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे या इमारतीत मोठया प्रमाणात कामे सुरू आहेत. तिसऱ्या मजल्यावरही महापौर दालन तसेच सभागृहाच्या डागडुजी आणि लिफ्टसह आतील डक्‍टचे काम बुधवारी सुरू होते. यावेळी मशीनच्या कंपनामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे पाहताना डाव्या हाताला असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा खालच्या बाजूचा स्लॅबचा तुकडा तुटला. यावेळी खालील बाजूस काही महिला कर्मचारी राडारोडा तसेच वाळू चाळत होत्या. त्यातील एकीच्या खांद्याला या तुकड्यामुळे दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, असे काहीच झाले नसल्सरवे महापालिका अधिकाऱ्यांनी भासविले आहे.

 

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
स्लॅब ढासळल्यानंतर काही प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहचले. तेथे भवन विभागाचे काही अधिकारीही उपस्थित होते. मात्र, घटना घडताच तातडीने स्लॅबचा तुकडा तसेच दुखापत झालेल्या महिलेला इतरत्र हलविण्यात आले. तसेच या प्रकाराची माहिती कोणालाही मिळणार नाही, याची खबरदारी घेत प्रशासनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुमारे 49 कोटी रुपये मुख्य इमारतीच्या मागील बाजूस विस्तारीत इमारत बांधण्यात आली. येथील सभागृहाचे उद्‌घाटन मागील आठवड्यात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा सुरू असतानाच छताला गळती लागून सभागृहात पाणी आले. त्यामुळे प्रशासन आणि इमारत उद्‌घाटनासाठी घाई करणाऱ्या भाजपवर टीका होत असतानाच, आता हा स्लॅब ढासळल्याने इमारतीच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे.

कालच दिले “स्ट्रक्‍चरल ऑडिट’चे आदेश
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत या इमारतीचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करणार असल्याचे सांगितले. तर, गळती घटनेनंतर विविध कारणे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेली होती. मात्र, आता साध्या व्हायब्रेशनमुळे नवीन गॅलरीचा स्लॅब ढासळत असेल, तर इतर कामाचा दर्जा काय असेल? याबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे राव यांनी हे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ सीओईपीकडून करणार असल्याचे सांगितल्यानंतर अवघे 24 तास लोटले असतानाच हा स्लॅब ढासळल्याने या इमारतीमागील शुक्‍लकाष्ठ अजून सुरूच असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)