नवे वर्ष नवा संकल्प : आठवड्यात एकदा “नो कार डे…’

संग्रहित छायाचित्र

प्रशांत दैठणकर

आज सर्वच ठिकाणी नवनवीन समस्या समोर येताना दिसतात. या समस्यांचं मूळ वाढत्या नागरीकरणात, झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणात आहे. आता प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे शहरांमधून होत असलेली वाहनांची कोंडी होय. शहर वाढीचे नियोजन शहरीकरणाच्या रेट्याने कोसळून पडले आहे. दुसऱ्या बाजूला वित्तीय संस्थांनी आपल्या फायद्यासाठी कर्ज सहजरित्या उपलब्ध करून दिले. रस्त्यांची असणारी क्षमता आणि त्यावर धावणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या यात खूप मोठी तफावत निर्माण झाल्याने मेट्रो शहरांपासून नगरपरिषद, ग्रामपंचायत क्षेत्रांमध्येही वाहतूक कोंडी बघायला मिळते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वाहतूक कोंडीने अनेक समस्या निर्माण झाल्या. ज्यात सर्वांत मोठी समस्या ही प्रदूषणाची आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे होणारे वायूप्रदूषण आणि वाहनांचे आवाज आणि हॉर्न यामुळे ध्वनिप्रदूषण असे दुहेरी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामातून मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
दिल्लीतील वायूप्रदूषणाची छायाचित्रे, दृष्ये आपण बघतो. त्यावर उपाय म्हणून दिल्ली सरकारने केलेला सम-विषम क्रमांकाच्या वाहनांना रस्त्यावर प्रवेश देण्याचा प्रयोग सपशेल कोसळला. प्रदूषणाची ही समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीरच होत आहे, हे वास्तव आहे. चारचाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. याचा लहान बालकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यांना लहानपणीच श्‍वसनाच्या विकारांना समोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे श्‍वास घेण्यास ज्यांना त्रास होतो अशा सर्वांच्या त्रासात देखील वाढ झालेली दिसून येते.

वाहतूक कोंडीचा वाढल्याने शहरी भागात मानसिक ताणतणावात वाढ झाली आहे. वाहनातील वायूप्रदूषणातून होणाऱ्या मृत्यूमध्ये जगात भारत सर्वांत वरच्या स्थानी आहे. लॅन्सेट प्रदूषण व आरोग्य समितीने 2017 साली जी निरीक्षणे नोंदली त्यात याचा धोका किती अधिक आहे हे स्पष्ट होते. लॅन्सेट कमिशनच्या अभ्यासानुसार सन 2017 मध्ये वाहनांमधील प्रदूषणामुळे जगात एका वर्षात 96 लाख लोकांचा मृत्यू झाला. यात भारतात सर्वाधिक 25 लाख तर चीनमध्ये 22 लाख जणांचा मृत्यू झाला. एकूण 48 टक्‍के मृत्यू हे या दोन देशात झाले.

वाहन प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार जडणे, श्‍वसनाचे आजार आणि तणावाखाली राहिल्याने “स्ट्रोक’ने मृत्यू होणे, ही याची प्रमुख कारणे आहेत. तसेच वाढत्या कार्बन उत्सर्जनाने पृथ्वीचे तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. यातून ऋतुचक्र बदलल्याचे दिसत आहे. अवेळी पावसाचे व्यस्त होत जाणारे प्रमाण आणि त्यातून कुठे महापूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अंटार्क्‍टिक व आर्किटक खंडातील हिमखंड वितळण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे समुद्रांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. याचेही गंभीर परिणाम येणाऱ्या काळात होणार आहेत.

वाहनांची जी देशपातळीवरील आकडेवारी उपलब्ध आहे ती थक्‍क करून सोडणारी आहे. 31 मार्च 2017 पर्यंत देशात नोंदणी झालेल्या एकूण वाहनांची संख्या 25 कोटी 23 हजार 54 इतकी होती त्यापैकी 14 टक्‍के अर्थात 2 कोटी 55 लाख 62 हजार 175 वाहने एकट्या महाराष्ट्रात आहेत. वाहनसंख्येत महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी आहे. त्याखालोखाल 10.72 टक्‍के तमिळनाडू 2 कोटी 25 लाखांहून अधिक उत्तर प्रदेश 10.3 टक्‍के अर्थात 2 कोटी 16 लाखांहून अधिक आणि चौथ्या स्थानी गुजरात 8.91 टक्‍के अर्थात 1 कोटी 87 लाखांहून अधिक वाहने अशी क्रमवारी दिसते.
देशात प्रदूषणाने होणारे मृत्यू 25 लाख आणि अपघातात होणारे मृत्यू वेगळे त्यामुळे ही वाहन समस्या किती गंभीर आहे हे आपणास लक्षात येईल. प्रत्येकाला स्वत:ची चारचाकी असण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या वाहन कंपन्या, त्यांना मदत करणाऱ्या वित्तीय संस्था यामुळे हे प्रमाण सातत्याने वाढतच आहे.

मुंबईसारख्या शहरात लोकल रेल्वे मेट्रो आणि बस यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर प्रभावीपणे होतो. त्यामुळे येथील वायूप्रदूषण कमी आहे. मात्र, येथेही स्वत:ची कार घेण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय टॅक्‍सीचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आता समोर येत आहेत. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर वाहनसंख्येचा भार वाढत आहे. त्यातून पुढचा प्रवास वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघात असाच आहे.

मुंबईतच नव्हे तर जगात सर्वच ठिकाणी सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर वाढण्याची गरज आहे. इंधनाचे दर वाढण्याचे मुख्य कारण त्याच्या वाढत्या मागणीत आहे. इंधनाचे दर वाढले म्हणून सर्वजण ओरड करीत असले, तरी स्वतंत्र वाहनाचा वापर कुणीही टाळत नाही. यातून देशाची परकीय गंगाजळी घटत आहे. जीवाश्‍म इंधन असल्याने ते येणाऱ्या काही वर्षात संपणार आहे. याची माहिती असूनही स्वतंत्र कार घेण्याचे प्रमाण मात्र वाढत आहे.

या सर्वांना जर नियंत्रणात आणायचे असेल तर प्रत्येक कारचालकाने आठवड्यातील किमान एक दिवस “नो कार डे’ अर्थात “कार ‘हॉलिडे’ पाळला तर खूप मोठे काम होणार आहे. हाच संदेश देण्यासाठी प्रत्येकाने आठवड्याला “नो कार डे’ साजरा करणे आवश्‍यक आहे. तसेच “आज मी माझी कार बाहेर काढत नाहीये; तुम्ही पण तसेच करा,’ असे संदेश समाजमाध्यमांतून प्रसारीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे “युटू’ अशी “नो कार डे’ची संकल्पना रुजायला हवी आहे. मग कधी सुरू करताय तुम्ही “कार हॉलिडे’ची?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)