नवी राजकीय बेरीज (अग्रलेख)

महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छ भारत अभियान’ सुरू करण्यात आले. महात्मा गांधी यांच्यावर काही वर्षांपूर्वींपर्यंत जणू कॉंग्रेसचा अधिकार होता. कॉंग्रेसच्या हातून गांधी कधी सटकले, हे तिच्याही लक्षात आले नाही. आता भाजपने गांधी यांचे खरे वारसदार आपणच असल्यासारखे वर्तन सुरू केले, हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. 
काही वर्षांपूर्वी गांधीविरुद्ध गांधी हे नाटक रंगभूमीवर आले होते. जगात मोठ्या माणसांत स्पर्धा लावण्याचा अश्‍लाघ्य प्रकार होत असतो. त्याला भारतही अपवाद नाही. खरे तर मोठ्या नेत्यांची तुलना करायचे काहीच कारण नाही. त्यांची तत्त्वे, त्यांचे विचार वेगवेगळे होते. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असत नाही. तसेच नेत्यांचेही असते. विचारांचा सामना विचारांनीच करावा लागतो; परंतु विचार संपले, की त्या व्यक्‍तींना संपविण्याचा प्रयत्न होतो. महात्मा गांधी यांच्यासारख्यांच्या वाट्याला हे दुर्भाग्य आले. असे असले तरी त्यामुळे महात्मा गांधी यांचे विचार संपले नाहीत. उलट, त्यांच्या विचारांची मोहिनी जगावर सत्तर वर्षांनंतरही कायम आहे. ज्या विचारसरणीने महात्मा गांधींचा खून केला. त्याचे समर्थन केले. महात्मा गांधी यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, कोट्यवधी रुपये पाकिस्तानला दिले, त्याचा दोषारोप गांधी यांच्या माथी मारला जात होता. नथुराम गोडसे यांचा जाहीर उदोउदो करणारे आता सत्तेत आले आहेत.
गांधी यांच्यापेक्षा सरदार वल्लभभाई पटेल यांना मोठेपण देऊन त्यांच्यात स्पर्धा लावण्याचे कामही झाले. पंडित नेहरू यांच्योपक्षा वल्लभभाईंना श्रेष्ठ ठरविण्याचेही राजकारण झाले. गांधी यांना तिरस्करणीय मानणाऱ्यांनी आता गांधीपूजा सुरू केली आहे. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छ भारत अभियान’ सुरू करण्यात आले. महात्मा गांधी यांच्यावर काही वर्षांपूर्वींपर्यंत जणू कॉंग्रेसचा अधिकार होता. कॉंग्रेसच्या हातून गांधी कधी सटकले, हे तिच्याही लक्षात आले नाही. आता भाजपने गांधी यांचे खरे वारसदार आपणच असल्यासारखे वर्तन सुरू केले, हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. लोकसभेच्या निवडणुकीत महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा फायदा कसा करून घेता येईल, याची व्यूहनीती मोदी यांनी केली. दुसरीकडे महात्मा गांधी यांच्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ असल्याची नवी टूम एमआयएम पक्षाचे असदोद्दीन ओवेसी यांनी काढली. गांधीविरुद्ध आंबेडकर हे नवे नाट्य आता भारतीय राजकीय मंचावर सुरू झाले आहे. गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते; परंतु पीडित, दलित आणि तळागाळातील घटकांचे कल्याण हा दोघांच्या विचाराचा समान धागा होता.
मतदारसंघाच्या आरक्षणावरून काही मतभेद दोघांत जरूर होते. त्यातून दोघांना मान्य होईल, असा तोडगाही पुणे कराराने काढण्यात आला. गांधी यांचे नावावर मतांचा जोगवा मागितला जात असला, तरी त्यांच्या नावावर मते देणाऱ्यांचे प्रमाण कमी असते. आंबेडकरांच्या नावाचा मतदानांत मात्र दबदबा असतो. त्यांच्या नावावर राजकारण करणारे अनेक पक्ष भारतीय राजकारणात आहेत. मोदी यांनी गांधी जयंतीचा मोठा इव्हेंट साजरा केल्यानंतर कॉंग्रेसलाही शांत बसणे शक्‍य नव्हते. त्यामुळेच कॉंग्रेस कार्यकारिणीची विशेष बैठक महात्माजींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्ध्यात आयोजित करण्यात आली.
मोदी आणि भाजप महात्माजींच्या विचारांचे वारस होऊ पाहात असले, तरी प्रत्यक्षात ते नथुराम गोडसे यांचा वारसा चालवू पाहात आहेत आणि त्यामुळे यापुढची प्रत्येक निवडणूक ही महात्म्याचे विचार विरुद्ध नथुरामचे विचार यांच्यात असेल,’ असे कॉंग्रेसने जाहीर केले आहे. महात्मा गांधी यांनी 1942 च्या आंदोलनात “चले जाव’ची घोषणा केली. तीच घोषणा आता कॉंग्रेसने 76 वर्षांनी केली. कॉंग्रेसमुक्‍त भारताच्या घोषणेला कॉंग्रेसने आता “चले जाव’ च्या घोषणेने प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून दलित व मुस्लीम एकत्र येण्याची चर्चा चालू होती. यापूर्वी हाजी मस्तान यांनी असा प्रयोग केला होता; परंतु त्या प्रयोगाला फारसे यश आले नव्हते. आता हाच प्रयोग पुन्हा ऍड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी सुरू केला आहे. औरंगाबाद येथे दोघांनी एकत्रित शक्‍तिप्रदर्शन करीत एकत्र येण्याचे संकेत दिले. त्यांचे एकत्र येणे हे कॉंग्रेसला नुकसान पोहोचविणारे आहे. ग्रामीण भागात नाही; परंतु शहरी भागात मात्र कॉंग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. एकीकडे भाजपच्या विरोधात महाआघाडी करण्याचे घाटत असताना दुसरीकडे या महाआघाडीच्या मार्गात काटे पेरण्याचे काम आंबेडकर व ओवेसी करीत आहेत.
अर्थात आंबेडकर यांच्यामुळे यापूर्वीही भाजपचाच फायदा झाला होता. रामदास आठवले व आंबेडकर यांचे अजिबात जमत नसले, तरी त्यांच्या भूमिका या भाजपच्याच पथ्थ्यावर पडणाऱ्या आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही. कॉंग्रेसशी आघाडी करण्याची तयारी असल्याचे या दोघांनी सांगितले असले, तरी त्यांची कृती मात्र वेगळीच आहे. यापूर्वी अनेकदा आंबेडकर यांनी आपल्या भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार ठिकठिकाणी उभे करून, मतांच्या वजाबाकीच्या खेळात भाजपला छुपी मदत केली आहे. ओवेसी यांचे राजकारणही आंबेडकर यांच्याच धर्तीवर भाजपला छुपी मदत करणारे असते. उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारंभार उमेदवार उभे करून, तेथील मुस्लीम मतांचे विभाजन घडवून आणले होते. त्याचा फायदा भाजपला झाला होता. अर्थात विदर्भातील काही मतदारसंघात या आघाडीचा फटका भाजप व शिवसेनेलाही बसण्याची शक्‍यता आहे. एकीकडे कॉंग्रेसशी युती करण्याचे संकेत द्यायचे आणि त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधीपेक्षाही मोठे नेते होते, असे समीकरण मांडतानाच नेहरू परिवारावरही टीकास्त्र सोडायचे, यातून अंतस्थ हेतू काही वेगळाच असल्याचे संकेत मिळतात.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)