नवीन वर्षांच्या शुभेच्छा…

अश्‍विनी महामुनी
“मम्मी, हे बघ….” ओंकार, माझा मुलगा हाती मोबाईल घेऊन नाचतच माझ्याकडे आला, मोबाईलवर आलेला मेसेज मला दाखवायला. तो घरात असला की माझा मोबाईल त्याच्याच ताब्यात असतो. पहिलीत असला, तरी मोबाईलमधील माझ्यापेक्षा जास्त त्याला समजते. गेम्स तर तो अगदी सराईतपणे खेळतो. मला तर बरेच गेम्स साधे ओपनही करता येत नाहीत नीट. आता तो मोबाईल घेऊन माझ्याकडे आला, तो त्याच्या मामाने त्याला पाठवलेला मेसेज दाखवायला. नवीन वर्षाचे ग्रीटिंग होते ते. हल्ली मोबाईल म्हणजे अलीबाबाची गुहाच झालेली आहे. त्यात अमूक एक गोष्ट नाही असे नाही. काय घ्यायचे ते समजणारा, योग्य ते निवडणाराच पाहिजे. अल्लादिन आणि जादूचा दिवा या गोष्टीत जादूच्या दिव्यातील राक्षस मागितलेली कोणतीही गोष्ट क्षणार्धात समोर आणून हजर करायचा ना, तशीच काहीशी गोष्ट आता या इंटरनेटने केलेली आहे.. आपल्या हातातील हा छोटासा स्मार्ट फोन अल्लादिनच्या जादूच्या दिव्यापेक्षा फारसा कमी नाही.

ओंकारने मला दाखवायला आणलेला नवीन वर्षाच मेसेजही तसा खास होता. त्यात झोके घेणारे रंगीबेरंगी ओंकार हे नाव होते, त्याला “टच’ करताच सप्तरंगी कारंजे उसळाचे तशी रंगांची बरसात होऊन त्यातून ओंकारचे चित्र तयार झाले. हॅपी न्यू ईयरचे गाणे लागले, फुलांची बरसात होऊ लागली. एकामागून एक महिन्यांच्या नावांची सजवलेली रेलगाडी आली. तिच्या प्रत्येक डब्यावर त्या त्या महिन्यासाठीचे संदेश होते, लहान मुलांना भावणारे. ते सारे पाहून ओंकार प्रचंड खुष झाला होता. ते परत परत पाहात होता.

-Ads-

नवीन वर्ष सुरू होण्याच्या आठवडाभर अगोदरच नवीन वर्षांच्या शुभेच्छा यायला सुरुवात होते. मोबाईलचा शोध लागला नव्हता तेव्हाही लोक शुभेच्छा देतच होते. पण तेव्हा बऱ्याच मर्यादा होत्या. भेट कार्डे पाठवणे हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी दुकानात जाऊन भेट कार्डांची निवड करणे (खिशाचा विचार करून), पोस्टातून तिकिटे आणणे, आणि पाकिटावर पत्ते लिहून, तिकिटे लावून वेळेवर पोस्टात टाकणे अशी लांबलचक वेळखाऊ प्रक्रिया होती तेव्हा.आणि ही भेट कार्डे पोहचायलाही दोनतीन दिवसांपासून सहासात दिवसांपर्यंत वेळ लागायचा. त्याचा हिशोब करूनच भेट कार्डे पाठवायला लागायची. या सर्व गोष्टींमुळे येणाऱ्या जाणाऱ्या ग्रीटिंग्जची संख्या अगदी मर्यादित असायची. आता या स्मार्टफोनमुळे क्षणार्धात सुनामी यावी तसा ग्रीटिंग्जचा लोंढाच येतो. इकडून पाठवले-तिकडे मिळाले असा झटपट कारभार झाला आहे.

पूर्वी नवीन वर्ष, दिवाळी, वाढदिवस अशा मोजक्‍या प्रसंगीचे भेटकार्डे पाठवली जायची. संक्रांतीला शक्‍यतो तिळगूळ पाठवला जायचा. आता वर्षभर कोणत्या ना कोणत्या दिवसासाठी (मोबाईलवर) शुभेच्छा येतच असतात. दिवाळीच्या तर वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवसाच्या वेगळ्या शुभेच्छा येतात, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा येतात आणि बैलपोळ्याचाही शुभेच्छा येतात. आपल्याला नसली तरी मोबाईलवाले त्या त्या दिवसांची आठवण करून देतात.
फेसबुक , व्हाट्‌स ऍप, इन्स्टाग्रॅम असल्या सोशल मीडियवर तर एकाने कोणीतरी मेसेज पाठवलेला दिसला, की तो पाहून सर्वांनाच आपली आठवण येते आणि मग संदेशांची मालिकाच लागते. अनेकदा हे सर्व संदेश पाहणेही होत नाही. मग उत्तर देणे दूरची गोष्ट.

इन्बॉक्‍स संदेशांनी भरून जातो. आणि ते “डीलिट’ करणे हेदेखीलएक रटाळ काम बनते. आपल्याला संदेश पाठवणारेही सर्वच जण आगदी स्नेहभावाने संदेश पाठवतात असे नाही. एक रूटिन असाच भाव असतो त्यात बरेचदा. नवीन वर्षाबाबत बोलायचे झाले तर आपण वर्षातून किती तरी वेळा नवीन वर्ष साजरे करतो. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते.त्याचा जल्लोश आपण 31 डिसेंबरला मध्यरात्री करतो. त्या रात्री रस्ते भरभरून वाहत असतात रात्रभर. जोरदार पार्ट्या चालतात. टीव्हीवर कार्यक्रमांची रेलचेल असते. वर्षाचा आढावा घेण्याचे काम सर्वच वाहिन्या करत असतात. काय बघावे आणि काय नाही, असे होऊन जाते.

आपले हिंदू नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेगुढी पाडव्याला सुरू होते. दिवाळीच्या पाडव्यालादेखील व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होते. विविध राज्यांतही नवीन वर्षाची सुरुवात इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या दिवशी होते. हिंदू नवीन वर्ष, ख्रिश्‍चन नवीन वर्ष, मुस्लीम नवीन वर्ष, शीख नवीन वर्ष अशी अनेक नवीन वर्षे आणि त्यांचे नववर्ष दिन असतात. पण नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा पाऊस पडतो, तो 1 जानेवारीलाच !

What is your reaction?
3 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)