नवीन भारत जातीयवाद, दहशतवाद आणि भ्रष्टाचारापासून मुक्‍त असेल – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली- न्यू इंडिया अर्थात नव भारत हा जातीयवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि दारिद्रयाच्या विषवल्लीपासून मुक्त असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि नव भारत कसा निर्माण केला जाईल याचा विचार विमर्श करावा असे आवाहन आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात त्यांनी केले आहे.

चैतन्याने सळसळणाऱ्या युवा शक्तीचे कौशल्य आणि धैर्य यातून नव भारताचे स्वप्न साकार होईल. नव भारतात प्रत्येकाला समान संधी राहील. 2000 किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी, 1 जानेवारी 2018 हे विशेष वर्ष असेल कारण या व्यक्ती नव भारतचे मतदार म्हणून मतदानाला हळूहळू पात्र ठरू लागतील. लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी, मतदान हे सर्वात प्रभावी साधन असून आपण 21 व्या शतकाचे शिल्पकार ठरू शकता, असे पंतप्रधान म्हणाले.

दिल्लीत 15 ऑगस्टच्या सुमाराला प्रतिरूप संसद आयोजित केली जावी आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या युवा प्रतिनिधीचा त्यात समावेश असावा असे त्यांनी सुचवले. युवकांना सर्व माहिती आणि संधी एकाच ठिकाणी मिळावी. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक युवक आणि युवतीला कौशल्य विकास, कल्पकता आणि उद्योजकता याविषयी आपोआप माहिती मिळेल अशी यंत्रणा निर्माण करायला हवी असे त्यांनी सुचवले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेला स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी जनतेचेही योगदान हवे असे त्यांनी सांगितले. देशभरात स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असून 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या काळात स्वच्छतेविषयी एक सर्वेक्षण केले जाणार आहे. 4000 शहरातल्या 40 कोटी पेक्षा जास्त जनतेला यात सहभागी केले जाईल.
महरम अर्थात पुरुष पालक बरोबर न घेताही मुस्लिम महिला आता हज यात्रा करू शकतात याचा उल्लेख त्यांनी केला. महरम असल्याशिवाय हज यात्रा करता येणार नाही ही गेली 70 वर्षांपासून चालत आलेली प्रथा अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आता दूर केली आहे.

प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी ऐतिहासिक उत्सव असतो मात्र यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी आसियान सदस्य राष्ट्रांचे दहा नेते भारतात प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत. भारताच्या इतिहासात ही अभूतपूर्व घटना आहे असे पंतप्रधान म्हणाले.
नाताळचा सण जगभरात उत्साहात साजरा करण्यात आल्याचे सांगून येशू ख्रिस्तांनी दिलेल्या सेवा भाव या महान शिकवणीचे स्मरण हा सण करून देतो असे पंतप्रधानांनी सांगितले. गुरु गोविंद सिंगजी यांची शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले आणि 2018 या नवीन वर्षासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छाही दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)