नवीन बसस्थानक कराडच्या वैभवात भर घालेल : मंत्री रावते 

कराडला नूतन बसस्थानकाचे उद्‌घाटन; महाराष्ट्रात नवीन 98 बसस्थानकांचे काम सुरु

कराड – प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज आणि सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक बसस्थानक शासनाच्या निधीतून कराडमध्ये बांधण्यात आले आहे. हे बसस्थानक कराडच्या वैभवात आणखीनच भर घालेल तसेच प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रात 98 बसस्थानकांचे काम सुरु आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त बांधण्यात आलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कराड येथील नूतन बसस्थानकाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, परिवहन महामंडळाचे उप महाव्यवस्थापक राहूल तोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

दिवाकर रावते म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी राज्यातील 113 ठिकाणांच्या बसस्थानकांना लवकरच संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. तर 85 प्रवास गृहांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधा असणाऱ्या विश्रामगृहासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापुढे महामंडळातील कर्मचाऱ्यांना शिक्षणासाठी बॅंकेचे कर्ज घ्यावे लागणार नाही, बीन व्याजी पैसे आता महामंडळ देणार आहे.

महामंडळातील कर्मचाऱ्यांची मुले महाविद्यालयात शिकत आहेत अशा मुलांच्या खात्यात दर महिन्याला थेट 750 रुपये जमा करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यानुसार बदल्या करण्यात येत आहेत. अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत शालेय मुलींना प्रवासासाठी मोफत पास महामंडळाकडून देण्यात येत आहे. कराडच्या नूतन बसस्थानकाच्या आणखीन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही परिवहन ग्वाही मंत्री रावते यांनी यावेळी दिली. तसेच कराड बसस्थानकासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच काळात निधी मंजूर झाल्याने या बसस्थानकाचे संपूर्ण श्रेय त्यांचेच असल्याचे स्पष्ट मत व्यक्‍त करीत बसस्थानकाचे उद्‌घाटनही आ. चव्हाण यांच्याच हस्ते घेण्यात आले.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दीनिमित्त कराडच्या बसस्थानकासाठी निधी देण्यात आला होता. या निधीतून सर्वसुविधांयुक्त अशी वास्तू तयार झाली आहे. कराड हे सर्वच बाबतीत महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे बसस्थानकाची अद्ययावत इमारत झाल्याने अनेकांची सोय झाली आहे. या माध्यमातून प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यामुळे कराडच्या वैभवात आणखीनच भर पडली आहे, असे ते म्हणाले.

खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, आजही सर्वसामान्य जनतेचा एसटी महामंडळावर विश्वास आहे. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करावी. शासनाने शिवशाही बस सेवा उपलब्ध करुन दिली हा एक चांगला निणर्य आहे. कराडसारखे सुसज्ज असे बसस्थानक सातारा येथे व्हावे, अशी इच्छा व्यक्‍त करीत कामगारांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, सर्वसामान्यांना घरापर्यंत-गावापर्यंत पोहचविण्याचे काम एसटी करते. लहान-मोठे उद्योग, शिक्षणाच्या सर्व सुविधा असणारे कराड शहर आहे. यात्रा कालावधीत या बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते अशा वेळी गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात. कराडमध्ये नवीन चांगले बनस्थानक झाले आहे आता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नव्या उमेदेने प्रवाशांना सेवा द्यावी, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले. यावेळी आमदार आनंदराव पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास राज्य मार्ग परिवहन मंडळातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक संख्येने उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे काम स्वच्छ
पांढरे शुभ्र कडक स्वच्छ कपड्यातील व्यक्‍ती म्हणजे कॉंग्रेसची असेच समीकरण राजकारणात झाले आहे. मात्र वरून स्वच्छ कपडे घालणाऱ्या राजकारण्यांचे काम तेवढे स्वच्छ असल्याचे आज दिसत नाही. मात्र आ. पृथ्वीराज चव्हाण त्याला अपवाद आहेत. ते जेवढे स्वच्छ कपडे घालतात तेवढेच त्यांचे कामही स्वच्छ आहे असा गौरव परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)