नवीन पाणी योजनेचे काम पूर्ण

राहाता – राहाता नगरपालिकेच्या नवीन पाणी योजनेचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आता या कामाचा शेवटचा टप्पा म्हणजे कॅनॉलला जोडणारे गेटचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये या नवीन साठवण तलावासाठी पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी दिली.

नगराध्यक्षा पिपाडा व भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी प्रत्यक्ष या कामाची पाहणी करून जलसंपदा विभागाचे अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या पिण्याच्या तलावासाठी सोडण्यात येणाऱ्या कॅनॉलच्या पाण्याची चाचणी तीन ते चार दिवसांत करावी याबाबत चर्चा केली. यावेळी बाळासाहेब गिधाड, दीपक सोळंकी, नगरसेवक निवृत्ती गाडेकर, डॉ. स्वाधीन गाडेकर, भाऊसाहेब आरणे, शुक्‍लेश्वर शेळके, शिवाजी आनप व ग्रामस्थ उपस्थित होते.

सन 2001 साली राहाता नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांनी ममता पिपाडा यांनी न.पा.वाडी शिवाराजवळ नगरपालिका हद्दीत 20 एकर जागा नगरपालिकेच्या पिण्याच्या साठवण तलावासाठी खरेदी केली; तेव्हापासूनच त्यांनी या कामाला प्राधान्य दिले होते. सन 2006 पर्यंत हे काम जवळपास 90 टक्‍के पूर्ण झाले होते. परंतु, गेल्या 10 वर्षांपासून या कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा 2017 साली ममता पिपाडा यांना नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. राहाता शहरवासियांना ऐन दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. प्रामुख्याने महिला वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी दुष्काळाच्या काळात शहराला 15 दिवसांनी पिण्याचा पाणीपुरवठा झाला. या सर्व गोष्टींचा नगराध्यक्षा यांनी आढावा घेतला व शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी लवकरच तलावाच्या ठिकाणी वीज कनेक्‍शन, इलेक्‍ट्रिक मोटार जोडणी व उर्वरित कामे येत्या महिन्यात पूर्ण करून तीन ते चार दिवसांत कॅनॉलद्वारे या तलावात पाणी सोडून चाचणी घेणार असल्याचे सांगितले.

मीटरद्वारे पाणीपुरवठा करणार

राहाता शहरवासियांना शुध्द पाणी देण्याचा मानस आहे. शहराला पिण्याचा पाणीपुरवठा दररोज व्हावा असा प्रयत्न आहे. पिण्याचे पाणी मीटरद्वारे देण्यात येणार असून त्यामुळे जेवढे पाणी वापरात येईल तेवढीच पट्टी भरावी लागेल. त्याचा राहातेकरांना फायदा होईल. गेल्या अनेक वर्षांपासूनचे साठवण तलावाचे स्वप्न आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे लवकरच पूर्ण करू, असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)