नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवा – कामर

एनडीएच्या 135 व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ संपन्न

पुणे – “महाविद्यालयीन तसेच शारीरिक शिक्षणाचे सर्वोत्तम प्रशिक्षण या संस्थेत तुम्हाला मिळत असते. मात्र ज्याप्रमाणे बदल हा सृष्टीचा नियम आहे, त्याचप्रमाणे सातत्याने चांगल्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही स्वत:ला सज्ज केले पाहिजे. स्वत:च्या कौशल्यांमध्ये सातत्याने अद्ययावत करणे हेच यशाचे खरे गुपित आहे. त्यामुळे तुम्हीदेखील आपल्या कलागुंणांमध्ये सातत्याने बदल करत रहा,” असा कानमंत्र असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे महासचिव फुरकान कामर यांनी दिला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 135 व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ गुरूवारी संस्थेत संपन्न झाला. याप्रसंगी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कामर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे प्रमुख एअर मार्शल आय. पी. विपीन, रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राध्यापक ओम प्रकाश शुक्‍ला आदी उपस्थित होते. यंदा प्रबोधिनीतून कला (59), विज्ञान (48) आणि संगणक विज्ञान (146) अशा तिन्ही अभ्याक्रमाच्या माध्यमातून 253 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मित्र राष्ट्रांतील 8 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यावेळी कॅप्टन जयप्रीत सिंग याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ चषक, रिषभ गुप्ता याला चीफ ऑफ नेव्हल स्टाफ चषक आणि यू. एस. गणेश याला चीफ ऑफ एअर स्टाफ चषक प्रदान करण्यात आला.

कामर म्हणाले, “एखाद्या विषयाचे शिक्षण अथवा प्रशिक्षण घेणे म्हणजे केवळ ती गोष्ट शिकणे असे नसून, त्या शिकवणीचा उपयोग व्यावहारिक जीवनात योग्यपणे कसा करावा, याचे प्रशिक्षण असते. त्याला अनुभवाची जोड असणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही जे शिक्षण घेतले त्याला प्रत्यक्ष व्यवहारात आणून स्वत:तील कलागुणांना नवीन झळाळी द्या. प्रबोधिनीमध्ये तुम्हाला नक्कीच उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यात आले आहे, मात्र या शिक्षणात नाविन्याची भर टाकून स्वत:चा विकास साधण्याची कला तुम्ही बाळगली पाहिजे.”

प्रबोधिनीतील ही पदवी म्हणजे तुमच्या प्रदीर्घ प्रवासातील एक “माइलस्टोन’ आहे. यापुढेही अजून बराच लांब पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. त्यामुळे तुम्हीही या प्रवासासाठी सज्ज व्हा, असे सांगत एअर मार्शल विपीन यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)