नवाब मलिक यांच्याविरोधातील मानहानीचा दावा मागे

बापट आणि मलिक यांनी उपस्थित राहून न्यायालयात केला होता अर्ज

पुणे – तुरडाळ गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर अन्न, नागरी पुरवठा तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा दावा शुक्रवारी मागे घेतला. बापट आणि मलिक या दोघांनी उपस्थित राहून दावा मागे घेण्यासंदर्भात अर्ज केल्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सय्यद यांनी हा आदेश दिला.
मलिक यांनी 19 नोव्हेंबर 2015 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे, असे आरोप केले होते. जीवनावश्‍यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या तूरडाळीच्या साठ्याची योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तूर डाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून डाळ जप्त करण्यात आली होती. या डाळीचा जाहीर लिलाव करण्याचे ठरवण्यात आले. तेव्हा मलिक यांनी बापट यांनी तूरडाळ प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. हे वृत्त विविध वृत्तवाहिन्या आणि पुण्यातील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे म्हणत बापट यांनी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केल होता. जी डाळ जप्त करण्यात आली, ती 540 कोटी रुपयांची होती. त्यामध्ये फक्त 140 कोटी रुपयांची तूरडाळ होती आणि मुक्त करण्यात आलेल्या डाळींची किंमत 43 कोटी रुपयांची होती. त्यामुळे याप्रकरणात भ्रष्टाचार झाला नाही, असा दावा बापट यांनी केला. तसेच, मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नसल्याने हा आरोप केल्याचेही बापट यांनी म्हटले होते. या प्रकरणी मलिक यांना समन्सही बजावण्यात आले होते. बापट यांच्या वतीने ऍड. एस.के. जैन आणि ऍड. अमोल डांगे यांनी ही याचिका दाखल केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)