संग्रहित छायाचित्र

तीन जणांचा मृत्यू, सहा बेपत्ता
नंदुरबार – एकाच रात्रीतून झालेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. नवापूर तालुक्‍यात शुक्रवारी पहाटे जवळपास 140 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली.
या मुसळधार पावसाने तालुक्‍यातील सरपणी, रंगावली अशा प्रमुख नद्यांना पूर आला होता. रंगावली नदी सकाळच्या सत्रात धोक्‍याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नवापूर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन संसार उपयोगी वस्तू आणि वाहने वाहून गेले.

विसरवाडी परिसरात वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला आलेल्या पुरात बालाहाट येथील जामनाबाई लाशा गावित या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचे पती झाडाला लटकल्याने ते मात्र थोडक्‍यात बचावले. तर खोकसा येथे पुराच्या पाण्यात घर पडून वंतीबाई बोधल्या गावित या महिलेचा मृत्यू झाला.

चिंचपाडा येथे देखील एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या तिंघाच्या मृत्यूसह नवापूर शहरातील मिनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोन जण बेपत्ता आहेत. प्रशासन आणि त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. पुराच्या पाण्यामुळे नवापूर तालुक्‍याचा रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

रात्रीपासून पाणाबारा गावाजवळ पूल खचल्याने अमरावती-सुरत महामार्गावरची वाहतूक विसरवाडीपासून नंदुरबारकडे वळवण्यात आली. या पाण्याने तालुक्‍यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पशुधनाच्या मृत्यूचीही मोठे आकडेवारी समजत आहे. जिल्हा प्रशासनाने पुरात अडकलेल्या अनेकांची सुटका केली असून युद्ध पातळीवर बचावकार्य आणि नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)