नवाजूददीनने पेलला ‘ठाकरे’

बॉलीवूड  मध्ये सध्या बायोपिकची हवा आहे, त्यातच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही चित्रपट येत आहेत, त्यापैकी एक म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर अधारीत अभिजित पानसे दिग्दर्शित ’ठाकरे’ होय. चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हा चित्रपट येण्याचे टायमिंग आणि निवडणुका यांचा संबध नाही असे सांगत आहेत, मात्र चित्रपटात काही घटनांमागील भुमिकेचे स्पष्टीकरण आणि काही घटनांवरील टाळलेल्रे भाष्य यावरुन हा चित्रपट शिवसेनेचे ’मिशन इलेक्शन’ असल्याचे स्पष्ट होते.

’ठाकरे’ चित्रपटाची कथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वादळी आयुष्यातील १९६० ते १९९४ या काळातील घटनांचा वेध घेणारी आहे.  बाळासाहेबांची पडद्यावर जोरदार एंट्री होते ती बाबरी मशीद खटल्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहचतात तिथुन, मग चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो. एक कुटुंब वत्सल माणूस जेव्हा भोवतालच्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करतो, आपल्या आक्रमक शैलीने मुंबईवर कसा ताबा मिळवतो हे ठाकरे चित्रपटातील कथेत नॉन लिनियरली दाखवण्यात आले आहे. बाळासाहेब फ़्रीप्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणुन कार्यरत होते, ती नोकरी सोडुन त्यांनी ’मार्मिक’ सुरु केले, याच साप्ताहिकातुन त्यांनी मराठी अस्मिता जपत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले, यातुनच मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी ’शिवसेना’ जन्माला आली. या संघटनेला बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि आशिर्वाद लाभला होता. शिवसेनाचा विस्तार होत असताना बाळासाहेबांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले, तुरुंगवास जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. काही राजकीय पक्ष आणि दहशतवादी संघटना यांना काहीशी जरब बसू लागली, केवळ आपल्या भाषणातून मराठी माणसाची मराठी अस्मिता जागी करणाऱ्या बाळासाहेबांचा आदरयुक्त दरारा तत्कालीन सर्वच नेत्यांमध्येही होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी चित्रपटातील प्रत्येक घटनेची कारणे तथ्याच्या पाठींब्यावर प्रभावी शैलीत, कल्पकपणे मांडली आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे, प्रखर देशप्रेमी, क्रिकेट प्रेमी, कलाप्रेमी, व्यंगचित्रकार, पती, मुलगा, भाऊ, पिता असे बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक, लेखक यशस्वी ठरले आहेत.  बाळासाहेबांच्या आदेशावर काहीही करण्यासाठी तयार असलेले शिवसैनिक, विविध आंदोलने मोठ्या खुबीने सादर करण्यात आले आहेत. मोरारजी देसाईंच्या मुंबई दौऱ्याला विरोध, कृष्णाजी देसाईंची हत्या, जॉर्ज फर्नांडिस-बाळासाहेब यांच्यातील जेलमधील संवाद, इंदिरा गांधींशी भेट, शरद पवार आणि बाळासाहेबांची राजकारणापलीकडची मैत्री, मातोश्रीवर मुस्लीम व्यक्तीने नमाज अदा करणे, मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रिमोट कंट्रोल असे अनेक प्रसंग लक्षवेधुन घेतात.

चित्रपटातील कलाकारांच्य अभिनयाबद्दल सांगायचे तर बाळासाहेब ठाकरे यांच्या भुमिकेत अभिनेत नवाजुद्दीन सिद्दीकीचा पडद्यावरचा वावर अतिशय सहज आहे. विशेषतः तरुणपणीचे बाळासाहेब त्याने प्रभावी वठवले आहेत. अमृता राव मिनाताईंच्या भुमिकेत सहज शिरली आहे. शिवाय मोरारजी देसाई, जॊर्ज फ़र्नाडीस, शरद पवार, इंदिरा गांधी, दत्ता सामंत, मनोहर जोशी यांच्य व्यक्तीरेख साकारणार्या कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

बाळासाहेब आपल्या खास संवादासाठी ओळखले जातात, चित्रपटात काही संवाद थेट त्यांच्य भाषणातुन घेतले आहेत, मात्र इतर संवादातुन आपल्या समोर ठाकरे शैली येत नाही. न्यायालयातील प्रसंग म्हणजे त्यांच्या सभा नाहीत हे लेखक, दिग्दर्शकाने ध्यानात ठेवायला हवे होते. कट्टर हिंदुत्वापुर्वी मुस्लिम लिगशी केलेली युती दाखवण्यचा प्रसंग बचावात्मक आहे, तर नामांतर चळवळ, श्रीक्रुष्ण आयोगाचा अहवाल असे महत्वाचे प्रसंग अनुल्लेखाने मारणे हा सत्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न आहे. कृष्णधवल पासून रंगीत झालेला चित्रपट हा प्रयोग लक्षवेधी आहे. चित्रपट म्हणुन ’ठाकरे’ मध्ये काही उणिवा आहेत, मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवास, शिवसेनेचा जन्म ते विस्तार समजुन घेण्यासाठी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयासाठी हा चित्रपट पहायला हरकत नाही.

चित्रपट – ठाकरे

निर्मिती – संजय राऊत

दिग्दर्शक – अभिजित पानसे

संगीत – रोहन – रोहन

कलाकार – नवाजुद्दीन सिद्दीकी, अम्रुता राव

रेटींग – ***

–    भूपाल पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)