नवसंस्थानिक नकोत (अग्रलेख)

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला त्यांच्या राज्यात नो एन्ट्री केली आहे. याचा अर्थ सीबीआयला आंध्रमध्ये कोणत्या गुन्ह्याचा तपास करायचा असेल, तर अगोदर त्या राज्याची परवानगी घ्यावी लागेल. अर्थात, तशी ती आवश्‍यक आहेच. यात नवीन काही नाही. सीबीआयला कोणत्याही राज्यात तपास करण्यासाठी अगोदर त्या राज्याच्या पूर्वपरवानगीची अट आहे. मात्र, ती परवानगी त्यांना विनासायास दिलीही जाते. केंद्र आणि एखादे विशेष राज्य यांच्यात टोकाचा संघर्ष अथवा मतभेद उफाळून आल्यावरही यात फारसा फरक पडला नाही व त्यामुळे सीबीआय नावाच्या केंद्रीय तपास संस्थेला राज्यांमध्ये विनासायास प्रवेश मिळत होता व त्यांचा दराराही कायम होता. त्याच सीबीआयला आता नायडूंनी परवानगी नाकारली आहे. सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि उपप्रमुख राकेश अस्थाना यांच्यात असलेला वाद व त्यांनी परस्परांवर केलेले आरोप या अनुषंगाने हा निर्णय योग्य ठरवला जात आहे. मात्र, वास्तव वेगळे आहे. अंतर्गत वादामुळे सीबीआयची प्रतिमा डागाळली आहे. संस्थेच्या विश्‍वासार्हतेबद्दलच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सीबीआय पूर्णपणे केंद्र सरकारच्या कच्छपी गेली असल्याची टीका पूर्वीही होत होती, आताही होत आहे. मात्र, पूर्वी सीबीआयमधील अंतर्गत हाणामारी समोर आली नव्हती. तपास करणाऱ्याचाच चेहरा एकदा चिखलाने माखला की कोणीही टपली मारायला मोकळे होते. त्यामुळे आपण कितीही अस्वच्छ असलो तरी स्वच्छतेचे प्रमाणपत्र देणाऱ्याकडेच बोट दाखवून वेळ मारून नेता येते. चंद्राबाबूंनी हीच संधी साधली. बदनामीच्या फेऱ्यात सापडलेल्या सीबीआयची आताच कोंडी केली तर आपल्याला कोणी बोल लावणार नाही असा हिशेब त्यांनी मांडला होता व यात त्यांना यश आले आहे. आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज व दर्जा न देण्याच्या मुद्द्यावरून नायडू आणि केंद्राचे संबंध बिघडले. त्यानंतर त्यांनी काही काळ मोकळा श्‍वास घेत राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर लगोलग सीबीआयला बंदीचा फतवा काढला. पण त्या अगोदर काय झाले, त्याबद्दल “मिस्टर क्‍लीन’ नायडू यांनी मौनच पाळले.

सीबीआयच्या अंतर्गत वादात सतीश सना नावाची व्यक्‍ती केंद्रस्थानी आहे. त्यांच्यांमुळेच वर्मा आणि अस्थाना यांच्यात वादळ उठले आहे. एका प्रकरणात वाचवण्यासाठी सना यांनी सीबीआयला लाच दिल्याचा आरोप आहे. संबंधित सना हे नायडू यांचे निकटवर्ती आहेत. नायडूंनी केंद्र सरकारपासून फारकत घेतल्यानंतर आंध्र प्रदेशातील त्यांच्या काही बड्या उद्योजकांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यात अर्थातच पुढच्या लोकसभा निवडणुकीचे अर्थकारण हा अँगल होता. आपली आर्थिक कोंडी करण्यासाठी केंद्र सीबीआयचा वापर करत असल्याचा सुगावा नायडू यांच्यासारख्या संधी हेरणाऱ्या माणसाला लागला नसता, तरच नवल होते. शिवाय, खुद्द नायडूंसह त्यांच्या घरातील व्यक्‍तीही सीबीआयच्या रडारवर होत्या. नायडू व त्यांचे पुत्र नारा लोकेश यांनी भ्रष्टाचार केल्याचा दावा करणारी याचिका माजी न्यायाधीश श्रवण कुमार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यांनीच सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गुंतवणुकीच्या नावाखाली बनावट कंपन्यांसोबत तब्बल 21 हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचा आरोपही लोकेशवर आहे. शिवाय जमीन बळकावण्याच्या एका प्रकरणातही वायएसआर कॉंग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. नायडूंच्या पत्नी भुवनेश्‍वरी यांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. नायडू 2013 मध्ये विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या विरोधातही बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण दाखल आहे. त्याची चौकशीचे सुरू आहे. दूरदृष्टीचे नेते असल्याची प्रतिमा, केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी मैत्रीसह बरोबरीचे संबंध स्थापित करण्याचे कसब आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेटसपासून इतर बड्या कंपन्यांच्या प्रमुखांसोबत उठबस व स्वत:ची “टेक्‍नोसॅव्ही नेता’ अशी निर्माण केलेली हवा, या सगळ्यामुळे नायडूंच्या बेहिशेबी मालमत्ता जमवण्यापासून खोटे करार करण्यापर्यंतच्या अन्य विशेष गुणांकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही.

एका अत्यंत प्रतिष्ठेच्या माध्यमानेच हा सगळा तपशील प्रसिद्धही केला आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या सीबीआयवर कुरघोडी करत नायडूंनी केवळ आपला स्वार्थच साधला आहे. आंध्र प्रदेशात नायडूंची जी प्रतिष्ठा आहे, तीच देशातल्या अन्य राज्यांत काही नेत्यांची आहे. “आपण म्हणजेच राज्य’ हा समज त्यांनी दृढ करून घेतला आहे. त्यामुळे केंद्र-राज्य संबंध, घटना, केंद्रीय तपास संस्थांचे अधिकार क्षेत्र आणि महत्त्व काय, यात त्यांना स्वारस्य नाही. “हे आमचे संस्थान आहे व तेथे आम्ही म्हणू त्याला प्रवेश आणि मज्जाव,’ असा लोकशाहीचाच अवमान सुरू आहे. संघराज्याच्या चौकटीला ते घातकच आहे. हे सगळीकडेच नवसंस्थानिक आणि व नागरिकांनीही समजून घेतलेले बरे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)