नववीच्या शिक्षकांना प्रशिक्षण

शिक्षण विभागाचा नेवासेत उपक्रम

नेवासा फाटा – पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीसाठी जलद गतीने शिक्षण (एएलपी) प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. नववीच्या विद्यार्थ्यांची गणित, इंग्रजी, मराठी व विज्ञान विषयांत प्रगती करण्यासाठी शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येते.

नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती संकुलातील दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात हे शिबिर संपन्न होत आहे. 17 व 18 जून या कालावधीत नेवासा खुर्द, नेवासा बुद्रूक, भानसहिवरा, गेवराई, करजगाव, प्रवरासंगम या ठिकाणी, तर 24 व 25 जून रोजी गोगलगाव, शिरसगाव, कुकाणा, भेंडा, उस्थळ व खरवंडी, तसेच 1 व 2 जुलै यादरम्यान घोडेगाव, चांदा, देडगाव, शिंगवेतुकाई, सोनई व मुळा कारखाना या केंद्रातील माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचे उद्‌घाटन नेवासा पंचायत समितीचे विषयतज्ज्ञ मधुकर घुले, आजिनाथ खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवरासंगम केंद्रप्रमुख गायत्री घोडके, जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, त्रिमूर्तीं पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन कर्डिले, प्रा. कडूस, तज्ज्ञ मार्गदर्शक राजेंद्रसिंग गहिले, बाबासाहेब पंडित व इतर मान्यवर उपस्थित होते.

तज्ज्ञ मार्गदर्शक सुधाकर आवारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. राजेंद्र सोनवणे, पंचायत समिती विषयतज्ज्ञ मधुकर घुले, प्राचार्य सचिन कर्डिले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. इस्माईल शेख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)