नववर्षानिमित्त पुणेकरांचा नॉनव्हेजवर ताव

800 बोकड, 250 टन चिकन, 25 टन मासळी फस्त

पुणे – आनंदाचा क्षण आणि नॉनव्हेजचा बेत हे समीकरणच बनले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या पुणेकरांनी सोमवारी नॉनव्हेजवर ताव मारला. वाढलेल्या मागणीमुळे 800 बोकड, 250 टन चिकन आणि 25 टन मासळीची विक्री झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षीच नववर्षाच्या आदल्या दिवशी नॉनव्हेजला प्रचंड मागणी असते. त्यामुळे चिकन, मटण, मासळी आणि अंडीच्या दरात वाढ होत असते. मात्र, यावेळी मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यातच 31 डिसेंबर सोमवारी असल्याने अनेकांचा उपवास होता. परिणामी, मागील वर्षीच्या तुलनेत मटण, मासळी, चिकन आणि अंडीला मागणी कमी होती. त्याचा फटका विक्रीला बसल्याने भावही स्थिर राहिले, असेही व्यापाऱ्यांनी नमुद केले.

मागीलवर्षी 2 ते 2.5 हजार बोकड, 400 ते 500 टन चिकन, 50 ते 60 टन मासळीची विक्री झाली होती. यंदा 50 टक्‍क्‍यांनी विक्री कमी झाली आहे. सोमवारी हॉटेल आणि खानावळी चालकांकडूनच मागणी होती. घरगुती ग्राहकांची संख्या अल्प होती. किरकोळ बाजारात मटणाचा किलोचा दर 480 रुपये, चिकनचा 120 रुपये, तर अंडीचा शेकड्याचा दर 484 रुपये होता; तर डझनाचा दर 66 रुपये होता, असेही व्यापारी रूपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

चाकण, तळेगाव, राशीन, लोणी, यवत, बारामती येथून बोकडाची आवक झाली. पुणे विभागातून चिकनची आवक झाली. तर मुंबई, कोकण आणि आंध्र प्रदेश येथून मासळीची आवक झाली. मार्गशीर्ष महिन्याचा मासळीलाही फटका बसला. मासळी बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची संख्या मर्यादित होती. त्यामुळे माल शिल्लक राहिला असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. चिकन, मासळी आणि अंडीपेक्षा मटण विक्रेत्यांना मोठा फटका बसल्याचे कांबळे यांनी सांगितले.

हॉटेल, खानावळीत झुंबड
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात सहकुटुंब घराबाहेर पडले होते. त्यामुळे रात्री आठ वाजल्यापासूनच नॉनव्हेजच्या हॉटेल आणि खानावळीत गर्दी झाली होती. रात्री दहा वाजता मात्र हॉटेलबाहेर खवयांची झुंबड उडाली होती. गर्दीला कंटाळून अनेकांनी पार्सल घेऊन जाणेच पसंद केले. मात्र, पार्सलसाठीही आर्धा ते एक तास प्रतिक्षा करावी लागत होती. हॉटेल चालकांनीही नववर्षानिमित्त खास मेनूची जाहिरात केल्याने रात्री उशीरापर्यंत अनेक हॉटेलबाहेर गर्दी कायम असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)