नववर्षाच्या स्वागताला थंडीची लाट

– 10 वर्षांतील नीचांकी 5.9 तापमान
– नागपूरचा पारा नागपूरमध्ये 3.5 अंशांवर
– पुढील दोन दिवसही कडाक्‍याच्या थंडीचे

पुणे – गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीने जोर पकडला असून किमान तापमानात सारखी घट होत आहे. शनिवारी गेल्या दहा वर्षांतील नीचांकी 5.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात दिवसभर गारठा जाणवत आहे. राज्यातसुद्धा अशीच परिस्थिती आहे. शनिवारी सर्वांत कमी तापमान नागपूरमध्ये 3.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शनिवारी संपूर्ण दिवसभर थंडी जाणवत होती. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कमाल तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 26 अंश सेल्सिअस नोंदला गेला.

मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा वाढला होता. हा प्रभाव बुधवारी रात्रीपासून कमी झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सातत्याने कमी होत होता.
बुधवारी किमान तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. तर, दुसऱ्याच दिवशी गुरुवारी चार अंश सेल्सिअसने कमी होऊन 10 अंश सेल्सिअस नोंदला गेला.

गेल्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात किमान तापमानाचा पारा 7.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. आज तर पारा 5.9 अंश इतका नोंदविला गेल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. सरासरीपेक्षा हा पारा 4.2 अंशाने कमी आहे. दरम्यान, शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

2010 मधील रेकॉर्ड मोडला
गेल्या दहा वर्षांत डिसेंबरमध्ये नोंदविण्यात आलेले शनिवारचे तापमान सर्वांत नीचांकी होते. यापूर्वी 2010 मध्ये 20 डिसेंबर रोजी सर्वांत कमी म्हणजे 6.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये डिसेंबरमध्ये 8.3 पर्यंत पारा खाली आला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पारा 8.7 पर्यंत घसरला होता. त्यानंतर आता शहरातील तापमान ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)