नवमतदारांनी यादीत नावे तातडीने नोंदवावीत

अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांचे आवाहन

पुणे – प्रत्येक नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही, याची खात्री करावी. तसेच युवक आणि मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते राहूल सोलापूरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्री छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते डॉ. दिनेश पांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, उप विभागीय अधिकारी भाऊ गलांडे, एच.व्ही. देसाई कॉलेजचे प्राचार्य गिरीश पठाडे, तहसीलदार देवदत्त ठोंबरे, बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.

-Ads-

यावेळी काळे यांनी लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व विषद करुन हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थितांना मतदार शपथ दिली. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी राजकारणातील सजगता, आजूबाजूला काय चालले आहे, याबाबतीतील सतर्कता लक्षात घेऊन योग्य व्यक्‍तीला निवडून देऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक नसतो, तर तो मानसिकतेशी निगडीत असतो. वाहतुकीचे नियम न पाळणे, मतदान न करणे हा एक प्रकारचा भ्रष्ट आचार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, श्री छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते डॉ. दिनेश पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी या वर्षी भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणुका ही संकल्पना राबविण्याचे निश्‍चित केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा प्रारंभ गणेशवंदनेने झाला. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. निवडणूक कार्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रांगोळी प्रदर्शन, पथनाट्यात भाग घेणा-यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नवमतदार, दिव्यांग मतदार,वंचित मतदारांना मतदार ओळख पत्र वितरित करण्यात आले. सकाळी महाविद्यालयातून मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये नेहरू युवा केंद्र, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, एच.व्ही. देसाई कॉलेज तसेच निर्भय नारी फाउंडेशन आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)