नवनाथ जगतापांनी ओलांडली “लक्ष्मण’रेषा

– आमदारांना घरातूनच आव्हान
– शिवसेना गटनेत्यांना आमदारकीच्या शुभेच्छा
निशा पिसे
पिंपरी – भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांना घरातूनच पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. “”कसं? भाऊ म्हणतील तसं”, असे आजवर छातीठोकपणे सांगणारे त्यांचे चुलतबंधू नगरसेवक नवनाथ जगताप यांनी “लक्ष्मण’रेषा ओलांडली आहे. आमदारांचे प्रतिस्पर्धी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्‍सबाजी करत “भावी आमदार’ म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यापाठोपाठ आता नवनाथ जगताप हेदेखील विरोधात गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा गृहकलह आमदार जगतापांसाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे.

सांगवी, पिंपळे गुरव पट्ट्यात पूर्वी दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. कालांतराने त्यांचे अनुयायी असलेले आमदार जगताप यांनी हळूहळू त्यांची जागा घेतली. त्यांनीही एकहाती आपला प्रभाव टिकवून ठेवला. मात्र, 2012 च्या महापालिका निवडणुकीतील घडामोडींमुळे जगताप यांचे कट्टर शिष्य प्रशांत शितोळे त्यांच्या विरोधात गेले. त्यावेळी शितोळे यांच्याविरोधात जगताप यांनी त्यांचे दुसरे समर्थक हर्षल ढोरे यांना अपक्ष म्हणून उभे केले. जाहीरपणे त्यांचा प्रचार केला. त्यावेळी ढोरे यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जगताप-शितोळे यांच्यात निर्माण झालेली दरी आजही कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. शेकाप-मनसेकडून त्यांनी लोकसभा लढविली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासमवेत त्यांचे समर्थक नगरसेवकही भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यामुळे त्यांचे चुलतबंधू व तत्कालीन नगरसेवक राजेंद्र जगताप आणि नवनाथ जगताप यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल कलाटे यांना पराभूत करत लक्ष्मण जगताप विजयी झाले. या सर्व राजकीय चढ-उतारामध्ये राजेंद्र व नवनाथ हे दोन्ही चुलतबंधू लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या घराचे “वासे’ फिरले. नवनाथ जगताप यांना थांबण्याच्या सूचना करत लक्ष्मण जगताप यांनी राजेंद्र जगताप यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली. त्यावेळी नवनाथ जगताप अपक्ष निवडणूक लढवत राजेंद्र जगताप यांचा पराभव केला. राजेंद्र जगताप डोईजड होऊ लागल्याने नवनाथ यांना लक्ष्मण जगताप यांनी छुपे पाठबळ देत निवडून आणल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या निवडणुकीनंतर राजेंद्र जगताप हे त्यांच्यापासून दुरावले. राष्ट्रवादीमध्ये परतत त्यांनी उघडपणे लक्ष्मण जगतापांच्या विरोधात निशाण फडकावले. या घडामोडीनंतर आमदार जगताप हे नवनाथ यांच्याशी हातचे राखून वागायला लागले. त्यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नवनाथ जगताप यांच्या विरोधकांना आमदारांनी बळ देण्यास सुरूवात केल्याने नवनाथ जगताप कमालीचे दुखावले आहेत. त्यांच्या मनातील खदखद राहुल कलाटे यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्‍सबाजीच्या माध्यमातून उफाळून आली आहे. सांगवी, पिंपळे गुरव परिसरात नवनाथ जगताप यांनी फ्लेक्‍स लावले आहेत. त्यात भावी आमदार राहुल कलाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे नमूद आहे. आमदार जगतापांना वैयक्‍तिक व राजकीय आयुष्यात सर्वस्व मानणाऱ्या नवनाथ जगताप यांच्या या भूमिकेमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे.

विरोधक मोट बांधण्याच्या तयारीत
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आमदार जगताप सज्ज होत आहेत. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहता आमदार जगताप यांना सर्वाधिक मताधिक्‍य पिंपळे गुरव, सांगवी भागातून मिळाले आहे. मात्र, हे मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे त्यांचे दोन्ही चुलतबंधू त्यांच्यापासून दुरावले आहेत. सांगवी व पिंपळे गुरव प्रभागातील दुखावलेले समर्थक मोट बांधण्याच्या तयारीत असल्याने आमदारांची वाट खडतर मानली जात आहे.

राहुल कलाटे हे माझे मित्र आहेत. मित्र प्रेमापोटी मी हे फ्लेक्‍स लावले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या पंधरा दिवसांत त्यांनी निवडणुकीची तयारी केली. त्यात थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला. मात्र, ते सक्षम, सर्वांना सामावून घेणारे आणि महत्त्वाचे म्हणजे निवडून येणारे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना आपण शुभेच्छा दिल्या.
– नवनाथ जगताप, नगरसेवक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)