नवतंत्रज्ञानाच्या वापरातून अधिकाऱ्यांनी जनतेशी नाळ जोडण्याची गरज – देवेंद्र फडणवीस

मुंबई: सध्याच्या कालखंडात देशातील जनतेच्या आशा-आकांक्षा प्रचंड उंचावल्या असून त्या पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मसूरी येथे केले.

उत्तराखंडमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये 93 व्या फाऊंडेशन कोर्समधील प्रशिक्षणार्थी आयएएस, आयपीएस आणि अन्य सेवांमधील अधिकारी तसेच मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामच्या चौथ्या फेजअंतर्गत प्रशिक्षणासाठी आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी नागरी प्रशासन, शेतीक्षेत्रातील बदल, आयात-निर्यात धोरण, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आणि इतरही विषयांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

-Ads-

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या लोकशाही व्यवस्थेने अतिशय सुंदर संविधान दिले आहे. त्यात सर्व प्रकारच्या व्यवस्था असून प्रत्येकाला मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, एखादी व्यक्ती आपल्या अधिकारांच्या पलिकडे जात असल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची व्यवस्थाही संविधानात आहे. संविधानाने जनतेतून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोरण ठरविण्याचा अधिकार दिला असला तरी या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार सनदी अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि त्यातून येणारे उत्तरदायित्त्व समजून घेऊन सर्वांच्या सहभागाने काम करावे लागेल.

युवा भारताच्या आशा-आकांक्षा प्रचंड उंचावल्या आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी जनतेशी असलेले संबंध मोठ्या प्रमाणात वाढवावे लागतील. सांघिक भावनेने काम केल्यास आपण निश्चितपणे बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी अश्वाप्रमाणे असणाऱ्या तंत्रज्ञानावर आरूढ व्हावे लागेल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या तसेच भविष्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स महत्त्वपूर्ण ठरणार असले तरी मानवी संवेदनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कुठलेही तंत्रज्ञान हे मानवाला पर्याय ठरू शकत नाही. तंत्रज्ञानाला योग्य दिशा देऊन त्या माध्यमातून प्रशासन आणि जनतेमधील दरी कमी करावी लागेल. देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक नागरिकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधतात, ही तंत्रज्ञानाचीच ताकद आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेनेही जनतेशी व्यापकपणे जोडून घेण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत करण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख आणि डिजिटल तंत्रज्ञानाधारित परिवर्तन प्रक्रियेची माहिती दिली. त्यासोबतच विविध क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या योजना-उपक्रमांच्या यशोगाथाही सांगितल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)