नवकवींना योग्य व्यासपीठ मिळावे

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार : नव्या बंडखोर कवींना प्रोत्साहित करणे आवश्‍यक

पुणे – अनेक श्रेष्ठ कवी बा. सी. मर्ढेकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांच्या पलिकडे जात नाहीत. ही बाब मला कायम अस्वस्थ करते. मर्ढेकर-तांबे हे श्रेष्ठ कवी होते हे मान्य आहे. पण आज अनेक शहरातून साहित्यिक पार्श्वभूमी नसलेल्या अनेक नव्या बंडखोर कवींचा वर्ग तयार होत आहे. त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण केले पाहिजे, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठीतील कविश्रेष्ठांना कानपिचक्‍या दिल्या.

महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा आणि बुकगंगा पब्लिकेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी सतीश राऊत लिखित “पाझर हृदयाचा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. ज्येष्ठ काव्यसमीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी अरुण शेवते, उद्धव कानडे, प्रकाशक मंदार जोगळेकर आदी उपस्थित होते.

-Ads-

पवार म्हणाले, कविता हा माझा प्रांत नाही. मात्र, मी नव्या पिढीतील कवींच्या कविता आवर्जून ऐकतो. मर्ढेकर-तांबे यांच्याशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. पण साहित्य, कला, पुस्तके यांचा काहीही गंध नसलेल्या कुटुंबात जन्मलेली नवी पिढी विचारप्रवर्तक काव्य करते. वऱ्हाड, चर्मकार समाजासारख्या उपेक्षित घटकातील कवींच्या कविता ऐकताना अस्वस्थता जाणवते. कष्टप्रद वेदनातून निर्माण होणारे सौंदर्य समाजाकडून नाकारले गेल्यावरचा राग त्यांच्या कवितेतून व्यक्त होतो. सतीश राऊत यांच्या कवितांमध्येही सामान्यांचे दुःख आणि वेदना आहेत. समाजातील वेदना मांडून ते बदलण्याचा प्रयत्न कवींनी केल्यास खऱ्या अर्थाने सामान्यांच्या जीवनात काव्य फुलेल, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी, सतीश राऊत यांच्या कविता समाजाभिमुख असून प्रेम, करुणा, बंधुत्व हे त्याचे मूलाधार आहेत. ही कविता वयासोबत विकसित झाली पाहिजे, असे मत काळे यांनी मांडले. सरकारी नोकरीत राहूनही संवेदनशीलता आणि परखड मत मांडण्याचे काम सतीश राऊत यांनी केले असल्याचे असे रामदास फुटाणे यांनी सांगितले. तर लोकांशी संवाद साधताना कविता कायम उपयोगी पडल्या, अशी भावना सतीश राऊत यांनी व्यक्त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)