पुणे: उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल

स्थायीची मंजुरी : 35 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी या मार्गिकेच्या आराखड्यामध्ये नळस्टॉप चौकात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) वतीने दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाचा खर्चाचा तपशील प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला असून, त्याला येणाऱ्या खर्चाची तरतूद टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

या उड्डाणपुलाच्या पहिल्या मजल्यापर्यंतचा आराखडा, डिझाइन आणि बांधकाम करण्यासाठी सुमारे 35 कोटी 25 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यात साडेचार टक्के देखरेख शुल्काचा समावेश आहे.

महामेट्रोच्या वतीने या उड्डाणपुलाचे काम होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या 2017-18च्या अर्थसंकल्पात 3 कोटी आणि 2018-19च्या अर्थसंकल्पात 14 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे काम महामेट्रोने करून त्यासाठी येणारा खर्च महापालिकेकडून अदा करण्याला मुख्यसभेने मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात टप्प्याटप्प्याने आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या संकल्पचित्रास 20 नोव्हेंबर 2017 रोजी तांत्रिक छाननी समितीने मान्यता दिली होती. मात्र प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा आणि सद्यस्थितीतील वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून महामेट्रोने 542.48 मीटर लांब, 12 स्पॅन (सर्व लोखंडी गर्डर) आणि 13 पिलरचा समावेश करून बांधण्यात येणाऱ्या दुमजली पुलाचे नवीन संकल्पचित्र (जीएडी) आणि एकूण खर्चापैकी पहिल्या मजल्यापर्यंत उड्डाणपुलासाठी पूर्वगणनपत्रक सादर करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. ही बाब प्रशासनाने स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली.

काय होणार पुलाचा फायदा
नळस्टॉप चौकात कर्वे रस्ता, विधि महाविद्यालय रस्ता, म्हात्रे पूल आणि पौड रस्त्याने येणारी वाहतूक एकत्र येते. त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी होते. हा उड्डाणपूल झाल्यास कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील वाहतूक दुहेरी मार्गाने पुलावरून होईल. त्यामुळे नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या रस्त्यावर मेट्रोचा नियोजित मार्ग असल्याने येथील मेट्रो आणि उड्डाणपूल ही दोन्ही कामे एकाच वेळी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

20 नोव्हेंबर 2017 रोजी मिळाली तांत्रिक छाननी समितीची मान्यता

542.48 मीटर पुलाची एकूण लांबी

13 एकूण पिलर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)