अहमदाबाद : नरोडा पाटिया दंगलीत गुजरात उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने माजी मंत्री माया कोडनानी यांची निर्दोष सुटका केली आहे.मात्र यातील बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. याशिवाय उच्च न्यायालयाने हरीश छारा आणि सुरेश लांगडालाही दोषी ठरवले आहे. अहमदाबादच्या विशेष एसआयटी न्यायालयाने बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणात तत्कालिन मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि नरोदाच्या आमदार माया कोडनानी, बजरंग दलचे माजी नेते बाबू बजरंगी, स्थानिक भाजप नेते बिपिन पांचाळ, किशन कोरानी, अशोक सिंधी आणि वकील राजू चौमाल यांच्यासह 61 आरोपी बनवण्यात आले होते. नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणाची कारवाई ऑगस्ट 2009 मध्ये सुरु झाली होती. यात 62 आरोपींविरोधात आरोप दाखल करण्यात आले. यात सुनावणी दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता. 26 फेब्रुवारी, 2002 रोजी साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्टेशनवर पोहोचली असता, अयोध्याहून परतलेले 57 कारसेवक असलेल्या बोगीत आग लावली होती. यानंतर संपूर्ण गुजरातमधील वातावरण बिघडले. गुजरातमध्ये दंगली भडकल्या. याच साखळीत 28 फेब्रुवारी, 2002 रोजी अहमदाबादच्या नरोदा पाटियामध्ये दंगल भडकली, ज्यात 97 लोकांची हत्या करण्यात आली होती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा