नरेंद्र मोदी ‘भल्लालदेव’, नीतीश ‘कट्टप्पा’

बिहारमध्ये रंगले पोस्टर वॉर

पाटणा- बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने रविवारी आयोजित केलेल्या ‘भाजपा हटाओ, देश बचाओ’ सभेनिमित्त राजधानी पाटण्यात पोस्टर वॉर पेटले आहे. राजदने बाहुबली चित्रपटावरून पोस्टर प्रसिद्ध केले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना बाहुबलीच्या पात्रांमध्ये रंगविण्यात आले आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना खुद्द बाहुबली दाखवले आहे.

राजदच्या या पोस्टरमध्ये अभिनेता नासेर म्हणजेच बाहुबलीतील बिज्जलदेव याचे छायाचित्र छापून त्याच्याखाली अमित शाह असे लिहिले आहे. पंतप्रधान मोदी यांना भल्लालदेव तर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना कट्टप्पाच्या रूपात दाखवले आहे.

राजदच्या लवकुश यादव नावाच्या कार्यकर्त्याने पाटण्यातील रस्त्यांवर हे पोस्टर लावले आहे आणि सध्या बिहारमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे संयुक्त जनता दल मात्र यामुळे राजदवर नाराज झाला आहे. या पोस्टरमधून राजद आपले चारित्र्य प्रदर्शित करत आहे, असे पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)