नरबळी प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात

एसआयटीकडे तपास न दिल्यास उंचखडक ग्रामस्थांचा “रास्ता रोको’

अकोले – उचंखडक येथील पाच वर्षीय बालक वेंदात देशमुख नरबळी प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील पूर्णवेळ विशेष पथकाकडेच (एसआयटी) द्यावा, या व इतर मागण्यासंदर्भात कार्यवाही झाली नाही, तर 15 ऑगस्ट रोजी सकाळी गावातील सर्व लहान मुलांसह ग्रामस्थ अकोले शहरात कोल्हार घोटी राज्यमार्गावर “रास्ता रोको’ करून “जेलभरो’ आंदोलन करतील,असा इशारा देण्याचा आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील उंचखडक बुद्रुक येथे तीन वर्षांपूर्वी वेंदातच्या नरबळीची घटना घडली होती. या प्रकरणी अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्यात आला. वेळोवेळी तपासी अधिकारी बदलले व पूर्णवेळ तपासी अधिकारी नसल्यामुळे तसेच तपासातील हस्तक्षेपामुळे तपासात प्रचंड त्रुटी राहिल्या.तपासाबाबत ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. पोलिसांनी तपासात केलेल्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थ व नातेवाईक संतप्त झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेऊन तपासातील त्रुुटी निदर्शनास आणून दिल्या. या प्रकरणाच्या फेरतपासाची मागणी केली तसेच तपास सीबीबीआयकडे देण्याची मागणी केली.

वेदांतच्या प्रथम स्मृतीदिनी म्हणजेच एक ऑक्‍टोबर 2016 पासून उचंखडकचे ग्रामस्थ मारुती मंदिरामध्ये उपोषणास बसले. तालुक्‍यातील 55 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव घेऊन उपोषणास सक्रिय पाठिंबा दिला होता. वेदांतच्या शाळेसह परिसरातील सर्वंच शाळांतील दहा-बारा हजार विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यात प्रशासनाचा निषेध केला होता. गावकऱ्यांची संतप्त भावना व संपूर्ण गावच उपोषणाला बसल्याची दखल घेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार वैभवराव पिचड यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

विखे यांनी नातेवाइंकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. सीआयडीकडे तपास वर्ग करण्यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन या घटनेच्या फेरतपासासाठी लोखंडे याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक केल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. गेल्या वर्षभरात लोखंडे यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून अनेक पुरावे गोळा केले. संशयीत आरोपीची नार्को टेस्ट करण्याचेही नियोजन केले; मात्रा वर्षभरानंतरच पुन्हा जिल्हा पोलिस प्रमुखांनी या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला. या विभागाकडे कामाच्या असलेल्या प्रचंड ताणामुळे तपासासाठी उशीर होऊ लागला आहे. त्यातच तपास पुन्हा अकोले पोलिसांकडे दिला जाणार असल्याचे समजते. यावरून पोलीस प्रशासन कोणत्याही एका अधिकाऱ्याला तपास व्यवस्थित करू देत नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

वेदांत प्रकरणाचा तपास शेवटच्या टप्यात असून तो पुन्हा लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील पूर्णवेळ विशेष पथकाकडे देण्यात यावा, आरोपीने तपासात सहकार्य न करता साथीदारांच्या मदतीने तपासी अधिकाऱ्यावर तपासात दबाव, अडथळे आणून औरंगाबाद खंडपीठाने जामीन देताना दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले असल्याने ही सर्व माहिती न्यायालयाच्या निर्देशनास आणून देऊन आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी गावाने केली आहे. तपासात हस्तक्षेप करणाऱ्या व थेट मंत्रालयातून तपासी अधिकाऱ्यावर दबाव आणून आरोपींचा बचाव करणाऱ्या त्या महिलेची चौकशी केली जावी व तपासात वारंवार अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नरबळी प्रकरण दडपण्याचे षडयंत्र

नगर जिल्हा पोलीस विभाग वेदांत देशमुख प्रकरणात निष्काळजीपणा करत आहे. या प्रकरणाला तीन वर्षे होत आहेत; मात्र पूर्ण वेळ अधिकारीच या प्रकरणाच्या तपासाला दिला जात नाही. पोलीस निरीक्षक लोखंडे चांगला तपास करत असताना त्यांच्याकडून तपास काढून घेतला. तपासी अधिकाऱ्यांना मंत्रालयातून फोन येतात. यावरून संगनमताने प्रकरण दडपून आरोपी निर्दोष ठरवण्याचेच षडयंत्र सुरू असल्याची गावकऱ्यांची खात्री झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मंडलिक यानी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)