नफेखोरीमुळे शेअरबाजार निर्देशांक स्थिर

मल्टिप्लेक्‍स कंपन्यांच्या शेअरच्या भावात झाली मोठी घट 
जागतीक बाजारातून सकारात्मक संदेश आले. जागतीक बाजारातील निर्देशांकात बरीच वाढ झाली. मात्र भारतीय शेअरबाजारातील निर्देशांक त्या प्रमाणात वाढले नाही. गेल्या आठवड्यात भारतातील किरकोळ महागाई वाढली आहे. त्याचबरोबर औद्योगीक उत्पादन कमी झाले आहे. व्यापारातील तुटही वाढल्यामुळे शेअरबाजारात खरेदी झाली नाही. 
– विनोद नायक, 
संशोधन प्रमुख, जीओजी वित्तीय सेवा 
मुंबई: जागतिक बजारातून आज सकारात्मक संदेश आले. मात्र, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी नफेखारी केल्यामुळे शुक्रवारी शेअरबाजाराचे निर्देशांक खालच्या पातळीवर राहिले. महाराष्ट्रात मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे पीव्हीआर, आयोनॅक्‍स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात अनुक्रमे 13.10 टक्‍के व 5.43 टक्‍क्‍यांची घट झाली. महागाईची आकडेवारी गुंतवणूकदारांत चिंता निर्माण करीत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक पुढील पतधोरणात पुन्हा व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता असल्याचे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटते. काल जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार महागाईचा दर 5 टक्‍क्‍यांवर गेला आहे. त्याचबरोबर आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार चालू व्यापारातील तूट बरीच वाढली आहे. सकाळी बऱ्यापैकी खरेदी होऊन मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 36740 या नव्या विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र, नंतर नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकांना ती पातळी राखता आली नाही. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा
निर्देशांक सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 6 अंकांनी कमी होऊन 36541 या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 4 अंकांनी कमी होऊन 11018 अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्‍स 282 अंकांनी वाढला होता.
आज जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर रुपयाच्या मूल्यातही वाढ होऊनही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून विक्री केल्याचे दिसून आले.
रिलायन्स कंपनीची सर्वसाधारण सभा गेल्या आठवड्यात झाली. या सभेत कंपनीने अनेक महत्त्वाकांक्षी योजना सादर केल्या आहेत. कंपनी ब्रॉड बॅंड क्षेत्रात प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर कंपनी मोठ्या ताकदीने रिटेल क्षेत्रात उतरणार आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. त्याचबरोबर या कंपनीचे बाजारमूल्य आज 701404 कोटी रुपयांवर म्हणजे 102 अब्ज डॉलरवर गेले होत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)