नदीसुधार प्रकल्पातील विघ्न सरेनात!

आता लोकसभेचा मुहूर्त : जानेवारीत सुरू होणार काम

पुणे – मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जपानमधील “जायका’ कंपनीच्या मदतीने महापालिकेकडून राबविण्यात येणारा मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प आणखी काही महिने लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याअंतर्गत काढण्यात आलेल्या निविदांनंतर वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जानेवारी उजाडणार आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाची सुरूवात होणार आहे.

नदीसुधार प्रकल्पाचा महापालिका आयुक्‍तांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी प्रशासनाने सादर केलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. सुमारे 950 कोटींच्या या प्रकल्पासाठी “जायका’ कंपनीकडून केंद्राच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पास केंद्राने जानेवारी 2016 मध्ये मान्यता दिली असली, तरी अजून काम सुरू झालेले नाही. पहिली 2 वर्षे सल्लागार नेमण्यातच गेल्याने या योजनेचे काम केवळ कागदावरच होते. त्यानंतर आता महापालिकेने या अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या 11 पैकी 6 मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातील 4 केंद्रांच्या कामाची पूर्वपात्रता निविदा भरण्याची मुदत 17 सप्टेंबरला संपत आहे. या निविदांनंतर येणारी माहिती “जायका’ कंपनीला ऑक्‍टोबरमध्ये पाठविली जाणार आहे. त्यानंतर पुढे दोन महिने “जायका’कडून पूर्वपात्रता मान्य होण्यास लागणार असल्याने डिसेंबर-2018 उजाडणार असून पुढे संबंधित कंपनीस काम देण्यासाठी जानेवारी-2019 उजाडणार आहे. त्यामुळे “जायका’कडून पूर्व पात्रता निविदांना मान्यता मिळाल्याशिवाय योजनेचे काम सुरू करणे अशक्‍य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाकडे पाठपुरावा करणार
या योजनेसाठी केंद्राने सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात आलेला सुमारे 26 कोटींचा निधी राज्यशासनाकडे वर्षभर पडून होता. त्यानंतर तो महापालिकेस देण्यात आला. या वर्षीही केंद्राने 31 कोटी रुपयांचे अनुदान दिले असून ते पुन्हा शासनाच्या तिजोरीतच पडून आहे. त्यामुळे हा निधी तातडीने मिळविण्यासाठी महापालिकेकडून राज्यशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)