नदीपात्रातील राडारोडा तातडीने काढा

कार्यवाही होणार का? : जलसंपदा विभागाचे पालिकेस पत्र


अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना


 पावसाळ्यात अडथळा येऊन पूर परिस्थितीची भीती

पुणे – नांदेड सिटी-शिवणे गाव परिसरात महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या मुठा नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नदीचे पात्र गिळंकृत केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून हा राडारोडा काढावा. तसेच नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, असे पत्र जलसंपदा विभागाने नुकतेच महापालिकेस दिले आहे.

नांदेड सिटी आसपास नदीपात्राच्या बाजूला मोठया प्रमाणात नवीन बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांचा राडारोडा थेट नदीपात्रात आणून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीचे पात्र अरूंद होत आहे. परिणामी, पावसाळ्यापूर्वी हा राडारोडा न काढल्यास नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूर स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हा राडारोडा टाकल्याची बाब ऑक्‍टोबरमध्ये समोर आली आहे. त्याबाबत स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पालिकेने कारवाई केली नसल्याने जलसंपदा विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणाशिवाय, शहरातून ज्या-ज्या भागातून मुळा-मुठा नद्या वाहतात, त्या भागातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली असून ती काढण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने तातडीने कारवाई करून अतिक्रमणे काढावीत, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यवाहीसाठी नकाशांचा आधार

जलसंपदा विभागाने महापालिकेस नदीच्या निळ्या व लाल पूररेषेचे नकाशे या पूर्वीच दिले असून ते महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. या नकाशांचा आधार घेऊन महापालिकेने कारवाई करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. याशिवाय या दोन्ही रेषांची माहिती पालिकेकडे असल्याने या रेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठीही खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचनाही या पत्रात करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)